नागपूर प्रतिनिधी :
दि. २५ मार्च २०२५
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक उत्थानासाठी अभूतपूर्व योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा अत्युच्च सन्मान होण्यासाठी त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्यासाठीचा ठराव आज विधानसभेत एकमताने मंजूर केला गेला.
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या हक्कांसाठी ज्यांनी आवाज उठवला ते महात्मा जोतिबा फुले व आद्य स्त्रीशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या थोर समाजसुधारक दांपत्याला ‘भारतरत्न’ या देशाच्या अत्युच्च गौरवाने सन्मानित करण्यात यावे, असा ठराव महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. दीनदुबळे, कष्टकरी, शेतकरी, महिला अशा सर्व घटकातील पीडितांना आपल्या हक्कांसाठी लढून, ताठ मानेने जगण्याची प्रेरणा ज्यांनी दिली ते महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य महान आहे.
आज मुलींना शिक्षणाचा समान अधिकार मिळालेला आहे याचे संपूर्ण श्रेय महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. बारा बलुतेदार असो किंवा अठरापगड जाती असो, आज सर्व समाज घटकातील मुलं – मुली उच्च शिक्षणाने पारंगत होऊन उच्च पदांवर काम करून देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत. याचे सर्व श्रेय जाते महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना!
अनेक तत्वज्ञ, समाजसेवक, नेते, कार्यकर्ते, विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी केलेले मान्यवर ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन घडले, ते या दांपत्यामुळेच. खरंतर, समाजात क्रांतिकारक बदल घडवून कित्येक पिढ्यांना जगण्याचा हक्क मिळवून देणाऱ्या व भारतीय समाजमनावर निर्विवादपणे अधिराज्य गाजवणाऱ्या या महान दांपत्याला ‘भारतरत्न’ हा गौरव मिळणे म्हणजे ‘भारतरत्न’ या पुरस्काराचा देखील तो सन्मान ठरणार आहे.
महायुती सरकारच्या या ठरावाला विधानभवनातील सर्वपक्षीय सदस्यांनी एकमुखाने मान्यता दिली.