डीडी न्यूज प्रतिनिधी.
पुसदः दि.२३ मार्च २०२५.
पुसद आगारात दाखल झालेल्या १० नवीन बसेसचे लोकार्पण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या बसेसमुळे पुसद तालुका व परिसरातील प्रवासी नागरिकांना वेळेत आणि तत्पर वाहतुक सेवा मिळणार आहे. तालुक्यातील सर्वच मार्गांवर बसेसची संख्या वाढणार आहे.
हा लोकार्पण सोहळा पुसद बसस्थानकावर संपन्न झाला.आजही ग्रामीण भागातील बहुतांशी प्रवासी ये-जा करण्यासाठी वाहतुकीचे प्रभावी साधन म्हणून लालपरी बसला प्राधान्य देतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या दळणवळासाठी बसेसला अनन्यसाधारण महत्व आहे. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जिल्हा नियंत्रक कच्छवेजी, आगार प्रमुख गद्धने, पुसद मतदारसंघातील जेष्ठ मार्गदर्शक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले, “कमी बसेसच्या संख्येमुळे काही गावांमध्ये व काही मार्गांवर नागरिकांची गैरसोय होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील नागरिकांसाठी नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात याकरीता परिवहन मंत्री महोदयांकडे सातत्याने पाठपुरावा करीत होतो. या पाठपुराव्याला यश आले असून पहिल्या टप्प्यात नवीन 10 बसेस उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या तालुक्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी बळकट होण्यास मदत झाली आहे. तसेच मागणी केलेल्या उर्वरीत बसेस देखील आपल्या एसटी डेपोच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत.”