डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. २६ मार्च २०२५
भारताच्या कबड्डी संघाचा माजी कर्णधार दीपक हुडा आणि त्याची पत्नी बॉक्सर स्वीटी बुरा यांच्यात मोठा वाद सुरू आहे. हे दोघेही क्रीडापटू घटस्फोट घेणार आहेत. पण तत्पूर्वी या दोघांमधील वाद अधिक चिघळलेला दिसला. स्वीटी बुराने पती दीपक हुडा याच्यावर हुंड्याची मागणी केल्याचा आरोप केला होता आणि हे दोघांचे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले आहे. या प्रकरणासाठी दोघेही पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले होते, जिथे स्वीटी बुरा दीपक हुड्डाच्या बोलण्यावर आक्रमक झाली आणि त्याला मारताना दिसली. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोघेही आपापल्या पक्षाच्या लोकांसह खोलीत बसलेले दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे हिसारच्या पोलीस ठाण्यात बसले होते. दोघांमध्ये काही संभाषण सुरू होते, ज्यानंतर अचानक स्वीटी बुरा खूप चिडलेली दिसते आणि त्याच्यावर चालून जाते आणि त्याची कॉलर धरते. कॉल धरून स्वीटी बुरा त्याला मारण्याचा प्रयत्न करते.
दीपक हुडा आणि स्वीटी बुरा हे दोन्ही पक्ष चर्चा करत असताना स्वीटी तिच्या सीटवरून उठते आणि दीपककडे जाते आणि त्याची कॉलर पकडते. दीपक बसून बोट दाखवत काहीतरी चर्चा करत आहे. त्याची कॉलर पकडण्याचा प्रयत्न करत असताना स्वीटी तिथेच पडते. दोघांमध्ये जोरदार वादावादी होते, त्यानंतर उपस्थित लोक मध्यस्थी करतात. यावेळी दोघेही एकमेकांवर ओरडत होते. स्वीटी खूप संतापलेली दिसत होती. खोलीबाहेर उभे असलेले लोकही आत आले आणि त्यांनी स्वीटीला शांत केले. या सर्व प्रकरणानंतर दीपक शांतपणे जाऊन आपल्या जागेवर पुन्हा बसला.
या प्रकरणाच्या एक दिवस आधी स्वीटी बुराने पत्रकार परिषद घेऊन दीपक हुड्डा याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. पतीच्या छळामुळे तिने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तिने सांगितले होते. ती इतकी तणावामध्ये आहे की जेव्हाही दीपकचा आवाज तिला ऐकू येतो तेव्हा तिला पॅनिक ॲटॅक येतो. तसेच तिला काही झालं तर तिच्या मृत्यूला दीपक हुडा आणि हिसारचे एसपी जबाबदार असतील असेही म्हटले आहे. स्वीटीच्या म्हणण्यानुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी दीपकची भेट घेतली आहे आणि कारवाई केली जात आहे.
महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२३ मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या स्वीटीने दीपक आणि त्याच्या कुटुंबावर हुंड्याच्या मागणीवरून छळ, अपमान आणि शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. तिच्या तक्रारीत तिने आरोप केला आहे की तिच्या कुटुंबाने लग्नासाठी सुमारे १ कोटी रुपये हुंडा दिला, ज्यामध्ये लग्नाच्या काही दिवस आधी फॉर्च्युनर एसयूव्हीची मागणी पूर्ण करण्यासाठी घेतलेले ११.५९ लाख रुपयेही आहेत. २०१६ च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या कबड्डीच्या भारतीय संघाचा दीपक हुडा भाग होता.