मुंबई प्रतिनिधी :
दि. २८ मार्च २०२५
विकी कौशलच्या ‘छावा’ ने अद्भुत कामगिरी केली आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये सुरू होऊन जवळजवळ दीड महिना झाला आहे आणि अजूनही तो तुफान चालतोय. चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील आकडे जबरदस्त आहेत आणि त्यामुळे निर्मात्यांच्या तिजोरीत पैसा भरला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रिलीजच्या सहाव्या आठवड्यातही या चित्रपटाने दररोज कोटींची कमाई केली आहे. ‘छावा’ने ४२व्या दिवशी किती कोटींची कमाई केली जाणून घेऊया.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. गेल्या दीड महिन्यापासून चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे. चित्रपटाच्या प्रचंड कलेक्शनचा विचार करता, तो अद्याप मोठ्या पडद्यावरून बाहेर पडण्यास तयार आहे असं वाटत नाही. विकी कौशल स्टारर हा चित्रपट २०२५ सालचा सर्वात मोठा सिनेमा बनला आहेच, पण त्याने अनेक मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत.
‘छावा’च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटी, दुसऱ्या आठवड्यात १८०.२५ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ८४.०५ कोटी, चौथ्या आठवड्यात ५५.९५ कोटी आणि पाचव्या आठवड्यात ३३.३५ कोटी रुपये कमावले. चित्रपटाने ३६व्या दिवशी २.१ कोटी रुपये, ३७ व्या दिवशी ३.६५ कोटी रुपये, ३८ व्या दिवशी ४.६५ कोटी रुपये, ३९ व्या दिवशी १.६ कोटी रुपये, ४० व्या दिवशी १.५ कोटी रुपये आणि ४१ व्या दिवशी १.४ कोटी रुपये कमावले. आता चित्रपटाच्या ४२ व्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘छावा’ने रिलीजच्या ४२ व्या दिवशी म्हणजे सहाव्या गुरुवारी १.४ कोटींचा गल्ला जमवला आहे. यांसह, ४२ दिवसांत ‘छावा’चं एकूण कलेक्शन आता ५८९.१५ कोटी रुपये झालं आहे. एल२ एम्पुरानच्या च्या रिलीजचा ‘छावा’ वर परिणाम झाला नाही. ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ४२ दिवसांनीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मोहनलाल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या एल२ एम्पुरानच्या रिलीजचाही या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झालेला नाही. ‘छावा’ने ४२ व्या दिवशीही कोटींचा गल्ला जमवला आहे.
‘छावा’ सध्या ६०० कोटींचा टप्पा ओलांडण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. पण सलमान खानचा सिकंदर ३० मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. सिकंदरची लोकप्रियता पाहता, त्याला बंपर ओपनिंग मिळण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, सिकंदरच्या आगमनामुळे ‘छावा’च्या कमाईवर ब्रेक लागतो का हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.