पुणे प्रतिनिधी :
दि. २९ मार्च २०२५
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याची रोल्स रॉईस कार अखेर आढळून आली आहे. पिंपरी चिंचवडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्या फार्म हाऊसवर ही गाडी सापडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रशांत कोरटकर याच्या मैत्रीपूर्ण संबंधातून ही कार बांधकाम व्यावसायिक कलाटे यांनी खरेदी केली असल्याची माहिती समोर येत आहे.
प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर राजकीय आश्रयामुळे तो फरार झाल्याची चर्चा होती. जवळपास महिनाभराच्या शोधानंतर दोन दिवसांपूर्वी त्याला पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, प्रशांत कोरटकरने जी कार खरेदी केली होती, ती कार घोटाळ्याचे आरोप असलेल्या महेश मोतेवार यांच्या कंपनीच्या नावावर आहे. सीआयडीला देखील ही गाडी सापडत नव्हती. मात्र पिंपरी चिंचवड येथील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्या मुळशी येथील फार्म हाऊसवर ही कार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, प्रशांत कोरटकर याच्यावर वकिलाकडूनच हल्ला करण्याचा प्रयत्न काल झाला. पोलिस बंदोबस्त असतानाही कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. कोरटकरला आणखी दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तो फरार असताना त्याला मदत करणाऱ्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
सध्या कोरटकर पोलिस कोठडीत आहे. कोठडीची मुदत शुक्रवारी संपणार होती. सुरक्षेच्या कारणासाठी सकाळी लवकर त्याला न्यायालयात नेण्यात आले. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्याला न्यायालयातून घेऊन जात असताना अचानक एका वकिलाने त्याच्या दिशेने चप्पल भिरकवण्याचा; तसेच अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अडवले. या घटनेने गोंधळ उडाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, अमितकुमार भोसले असे त्याचे नाव आहे.
प्रशांत कोरटकर फरार असताना त्याला मदत करणाऱ्यांना कोल्हापूर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कोरटकर सदर गुन्ह्यात फरार असल्याची माहिती असताना या लोकांनी त्याला फरार होण्यात व लपविण्यात सहकार्य केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नोटीस पाठविली आहे. पोलिसांनी त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर ही नोटीस पाठविल्याचे कळते. यातील एक जण प्रतीक पडवेकर हे नागपुरातील रहिवासी आहेत.