मुंबई प्रतिनिधी :
दि. ३१ मार्च २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी नागपूर दौरा झाला. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ वर्षांनी संघाच्या मुख्यालयामध्ये गेले. यावेळी मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट झाली. या दौऱ्याबाबत बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांचा वेळ आता संपला असून पुढचा वारसदार ठरवण्यासाठी चर्चा केल्याचा दावा केला आहे.
मोदींचे पुढचे वारसदार राष्ट्रीय स्वसंसेवक संघ ठरवेल असं दिसत आहे. म्हणूनच मोदींना बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. संघाची चर्चा ही बंद दाराआड असते, ती बाहेर येत नाही. तरीही संकेत स्पष्ट असतात. संघ ठरवेल पुढचा नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल, असं मोठे विधान संजय राऊत यांनी केले आहे.
सप्टेंबरमध्ये निवृत्तीचा अर्ज लिहिण्यासाठी कदाचित ते संघ मुख्यालयात गेले असावेत. मला जी माहिती आहे त्यानुसार मोदी गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये गेले नाहीत. आता मोहन भागवत यांना सांगण्यासाठी गेले की टाटा बाय बाय मी जात आहे. संघाच्या दोन गोष्टी आहेत, ज्या माझ्या लक्षात आल्या आहेत. मोहन भागवत आणि संघ परिवार आता देशाच्या नेतृत्त्वात त्यांना बदल हवा आहे. भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षही त्यांच्या मर्जीचा निवडायचा आहे त्यासाठी मोदी तिथे गेले होते. मोदी आता जात आहेत. या भेटीचे संकेत स्पष्ट आहेत की, मोदींनी जाहीर केलेल्या धोरणानुसार ७५ वर्षे झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये. त्यामुळे सरसंघचालकांनी त्यांना या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी चर्चा केली असावी. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संघाची भूमिका आहे असं समोर आलं आहे. ज्या अर्थी दहा-अकरा वर्षांनी नागपूरात जाऊन मोदींना सरसंघचालकांना भेटावं लागलं ही काही साधी गोष्ट नाही. ४०० पारसाठी जे.पी. नड्डा यांनी संघाची गरज नसल्याची भाषा केली होती. जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो तेव्हा तेव्हा पंतप्रधान मोदींची भूमिका असते. त्यामुळे मोदींना का यावं लागलं हे समजून घ्या, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.