डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. ०२ एप्रिल २०२५
वक्फ संशोधन विधेयक आज लोकसभेत सादर केले जाणार आहे. सत्ताधारी एनडीए हे विधेयक मंजूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना, विरोधी पक्षही याला तीव्र विरोध करण्यासाठी एकवटले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार वक्फ संशोधन विधेयक आज दुपारी १२ वाजता लोकसभेत सादर केले जाईल. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हे विधेयक लोकसभेत मांडणार आहेत. या विधेयकावर चर्चेसाठी ८ तासांचा वेळ देण्यात आला आहे परंतु सरकारने म्हटले आहे की जर सभागृह सहमत असेल तर चर्चेचा वेळ वाढवता येईल. सरकार आजच चर्चेला उत्तर देईल. त्याच वेळी, सत्ताधारी पक्ष भाजपने आपल्या सर्व खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे आणि त्यांना आज सभागृहात उपस्थित राहाण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे, टीडीपी आणि जेडीयूने त्यांच्या खासदारांना व्हीप जारी केला आहे. दुसरीकडे, वक्फ विधेयकाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्षही एकवटला आहे.
गरीब मुस्लिमांना पंतप्रधान मोदींकडून अपेक्षा आहेत असे शादाब शम्स यांनी म्हटले आहे. वक्फ संशोधन विधेयकावर उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स म्हणाले, “गरीब मुस्लिमांना पंतप्रधान मोदींकडून अपेक्षा आहे आणि म्हणूनच आम्ही या दुरुस्ती विधेयकाला ‘उमीद’ असे नाव दिले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे आशेचा किरण आहेत. पंतप्रधान मोदी सरकारने गरीब मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्णय घेतला आहे.”
हे विधेयक ९ महिन्यांनंतर पुन्हा सादर केले जात आहे. गेल्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले होते, तेथून ते जेपीसीकडे पाठवण्यात आले होते. जेपीसीने २२ ऑगस्ट रोजी आपले काम सुरू केले, त्यानंतर हा अहवाल सादर करण्यात आला आणि २७ फेब्रुवारी रोजी सुधारित मसुदा मंजूर करण्यात आला. आता आज ९ महिन्यांनंतर हे विधेयक पुन्हा लोकसभेत सादर केले जात आहे.