मुंबई प्रतिनिधी :
दि. ०२ एप्रिल २०२५
मुंबईच्या दोन माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिशा सालियनचे वकील निलेश ओझा यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. या दोन्ही माजी पोलीस आयुक्तांनी निलेश ओझा यांना दिशा सालियन प्रकरणाशी संबंधित एक पेनड्राईव्ह दिला आहे. या भेटीवेळी दिशा सालियनचे वडील सतीश सालियनदेखील तिथे होते, अशी माहिती देखील समोर येत आहे.
ए. पी. निपुंगे आणि भीमराज घाडगे या दोन माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी वकील निलेश ओझा यांना पेनड्राईव्ह दिल्याची माहिती आहे. या पेनड्राईव्हमध्ये दिशा सालियन प्रकरणाशी संबंधित माहिती असल्याचा दावा केला जातोय. संबंधित पेनड्राईव्हमध्ये फोटो, व्हिडीओ रेकॉर्डिंग, स्टिंग ऑपरेशन फुटेज आणि इतर महत्त्वाचे दस्तावेज असल्याची चर्चा आहे.
हे सर्व पुरावे मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतर आरोपींच्या विरोधात असल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर, दिशाच्या हत्येला आत्महत्येचं रुप देण्यासाठी पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये देखील फेरफार करण्यात अल्याचा पुरावा पेनड्राइव्हमध्ये आहे असं देखील सांगण्यात येत आहे.
या पेनड्राईव्हमुळे दिशा सालियन प्रकरणात काही नवे खुलासे होतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी लवकरच पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार असून, त्यात हे पुरावे समोर येणार आहेत. सध्या सर्वत्र दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
ठाकरेगटाचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आणि अन्या आरोपींची देखील नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी केली आहे. ‘मी स्वतःच्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. या प्रकरणी जे साक्षीदार आहेत त्यांना सुरक्षेची गरज आहे.
शिवाय सीन रिक्रिएशनची देखील मागणी केली आहे. कारण दिशा 25 फूट खाली उभ्या असलेल्या कारवर पडली नाही तर, कार शेजारी पडली होती. बिल्डिंगच्या छतावरुन पडली असती तर ती 25 फूट लांब कशी पडली असती. असं होऊच शकत नाही. हा नियोजित कट आहे…’ असं देखील दिशा सालियनचे वडील म्हणाले आहेत.