मुंबई प्रतिनिधी :
दि. ०४ एप्रिल २०२५
विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५० दिवस पूर्ण करणार आहे. फार कमी चित्रपटांमध्ये असं घडतं की, ते इतके दिवस पडद्यावर राहू शकतात. चला तर मग जाणून घेऊया सिनेमाच्या कमाईबद्दल. विकी कौशलचा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झालेल्या साऊथच्या एल२ एम्पुरन आणि सलमान खानच्या सिकंदर या चित्रपटांविरुद्ध उभं राहणं ही एक उत्तम गोष्ट आहे.
‘छावा’ बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून तुम्ही अवाक व्हाल. ५ आठवड्यांच्या अधिकृत आकडेवारीनुसार आणि ६ व्या आठवड्याच्या सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, छावाने ४२ दिवसांत ६०२.११ कोटी रुपये कमावले. ४३ व्या, ४४ व्या आणि ४५ व्या दिवशी चित्रपटाने अनुक्रमे ₹ १.१५, ₹ २ आणि ₹ १.१५ कोटींची कमाई केली. ४६ व्या, ४७ व्या आणि ४८ व्या दिवशी चित्रपटाने अनुक्रमे ०.९, ०.५५ आणि ०.४ कोटींची कमाई केली. अशाप्रकारे, चित्रपटाने गेल्या ४८ दिवसांत ६०८.२६ कोटी रुपये कमावले आहेत.
छावाच्या कालच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, सकाळी १०:४० वाजेपर्यंत चित्रपटाने ०.४० कोटींची कमाई केली आहे आणि एकूण कमाई ६०८.६६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.
पुष्पा २ ने ४९ व्या दिवशी हिंदीतून ३८ लाख रुपये कमावले होते. ‘छावा’ आता हेही मागे टाकत आहे. तसंच, ४९ व्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने ‘गदर २’ च्या ०.०५ कोटी, ‘जवान’ च्या ०.१७ कोटी आणि ‘पठाण’ च्या ०.३ कोटी रुपयांच्या कलेक्शनला मागे टाकलं आहे.
दरम्यान, विकी कौशलने ‘छावा’मध्ये संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना, डायना पेंटी, अक्षय खन्ना आणि विनीत कुमार सिंग यांच्याशिवाय आशुतोष राणा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून या सिनेमाचं बजेट १३० कोटी रुपये आहे.