नांदेड प्रतिनिधी :
दि. ०४ एप्रिल २०२५
राज्यामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नांदेडमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये कामगार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नांदेडच्या आलेगाव येथील एका शेतामध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर कोसळला. यामध्ये हळद काढणी करणारे ०९ ते १० मजूर खोल विहिरीत पडले आहेत. यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारी (दि.०४) सकाळी हा अपघात घडला. यामध्ये मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर संपूर्ण ट्रॉलीसह विहिरीत कोसळून हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार यामधील अपघातातग्रस्त लोक हे हिंगोलीतील गुंज तालुक्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. अपघातग्रस्त मजूरांना वाचवण्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी मदतकार्य सुरु असून पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे.
या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या मृतांच्या संख्येची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र विहिरीमध्ये गाळ असल्यामुळे कामगारांना वर येण्यास अडथळा आला आहे. तसेच बचावकार्यात देखील यामुळे अडथळा निर्माण होत आहे. ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानंतर पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे खालच्या गाळात तो रुतल्याचं दिसून येत आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून यामध्ये अनेकांचा जीव गेला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. हिंगोली जिल्ह्यातील काही महिला मजूर यांना हळद काढणीसाठी एक ट्रॅक्टर जात होता. मात्र त्या ट्रॅक्टर चालकाला विहिरीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ट्रॅक्टर थेट विहिरीत जाऊन कोसळला. राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे चिखल देखील झाला आहे. यामध्ये ट्रॅक्टरचे टायर स्लीप झाल्याने ही घटना घडली. या विहिरीत पाणी असल्याने अनेक महिला यात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. ताराबाई जाधव, धृपता जाधव, मीना राऊत, ज्योती सरोदे, चौथराबाई पारधे, सरस्वती भूरड, सिमरन कांबळे अशी मृत महिलांची नावं आहेत. तर पुरुभाबाई कांबळे, पार्वती बुरड, सटवाजी जाधव यांना वाचवण्यात यश आलंय
विहिरीमधील मजुरांना वाचवण्यासाठी दोरखंड सोडण्यात आले आहेत. तसेच अडकलेल्या मजुरांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यातील दोन महिलांना पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र ट्रॅक्टर ट्रॉली आणि काही महिला या विहिरीतच पडलेल्या आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.