पोपटराव पवार, ऋतूराज देशमुख व कोमल करपे यांनी आपली गावे कोरोना मुक्त केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष अभिनंदन केले. यानंतर, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सडेगाव पुर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. हे गाव कोरोनामुक्त करण्यासाठी युवा नेते धीरज भैय्या पानसंबळ यांनी गावक-यांना सोबत घेऊन विशेष कामगिरी केली. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
जेमतेम चार हजार लोकसंख्या असलेलं आणि देव नदी च्या तीरावर वसलेलं एक छोटसं टुमदार गाव, राहुरी कृषी विद्यापीठापासून अडीच किलो मीटर अंतरावर असलेलं गाव, आर.आर.आबा पाटील ग्रामस्वच्छता अभियनातील सुंदर गाव, राहुरी तालुक्यातील गुण्यागोविंदाने राहणारे गाव म्हणून ज्या गावाची ओळख आहे ते गाव म्हणजे, सडे गाव होय.
सुखी व समृद्धी असलेल्या सडे गावाला कोरोनाच्या पहिल्या लाटेत फारसा फैलाव झाला नाही. मात्र, कोरोनाच्या दुस-या लाटेत सडेगावात कोरोनाचा शिरकाव झालाच. एक, दोन म्हणता म्हणता कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णांची संख्या शंभरवर गेली. शंभरी पार करुन कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने दोनशेचा आकडा पार ही झटक्यात पार केला.
संकट सा-या गावासमोर आ वासून उभे होते. वेळीच या संकटाला रोकले नाही तर गावात हाहाकार माजेल, याची कल्पना गाव कारभा-यांना झाली होती.धीरज भैय्या पानसंबळ यांच्या संकल्पनेतून व राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात कोव्हिड सेंटर उभारण्याचे निश्चित झाले. मग, गावचे सरपंच चंद्रकांत पानसंबळ, उपसरपंच कल्पना साळवे यांनी विशेष सहकार्य केले. ग्रामपंचायत सदस्य गणेश घोरपडे यांनी या कामी सिंहाचा वाटा उचलला. अखेर धीरज भैय्या पानसंबळ यांनी पुढाकार घेऊन सर्वांच्या सहकार्याने प्राजक्त दादा तनपुरे आरोग्य मंदिर नावाने गावामध्ये एका शाळेत २० बेडचे कोव्हिड सेंटर सुरु केले. आणि मग गावातच कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरु झाले. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने धास्ती घेतलेल्या सडे गावाने अखेर मोकळा श्वास घेतला. हे कोव्हिड सेंटर चालविण्यासाठी लागणारा निधी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी भरभरुन सढळ हाताने दिला. या कोव्हिड सेंटरला जवळपास दिड पाऊने दोन लाखांची मदत नागरिकांनी उभी केली. त्याचबरोबर दानशुर शेतक-यांनी चार पोती गहू,भाजीपाला व इतर धान्य दिले, प्राजक्त दादा तनपुरे आणि ग्रामस्थांनी मदत निधी दिला. युवकांनी वाढदिवस टाळून कोव्हिड सेंटरला जेवण दिले, गावातील शिक्षक व नोकरदार यांनी वर्गणी गोळा करुन निधी दिला.
या कोव्हिड सेंटर मध्ये रुग्णांना चांगल्या पद्धतीच्या सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. सकाळचा चहा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा व रात्री आठ वाजताचे जेवण कोव्हिड रुग्णांना दररोज दिले जात होते. आठवड्यातून दोन वेळा नॅानव्हेजचे जेवण दिले जात असे.
सर्व औषधे देखील रुग्णांना मोफत दिली जात होती. रुग्णांना तपासणीसाठी राहुरी हून दररोज खास एम.डी डॉक्टर शेटे यांना बोलविण्यात येत होते. आरोग्य खात्याचे डॉक्टर रोज दुपारी राऊंड मारत होते. विशेष म्हणजे, रुग्णांचा मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी मनोरंजन कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले होते.
या सर्वाचा परिपाक, आज अखेर गावातील कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. कोरोना संकटाने जागतिक पातळीवरच्या मोठ मोठ्या सत्ता ना नाकीनऊ आणले असताना एका छोट्याशा गावाने कोव्हिड सेंटर उभारुन कोरोनाला हद्दपार केल्याचा सर्वांना हेवा वाटत आहे.
धीरज भैय्या यांनी अथक प्रयत्न करुन कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करुन दिले, रुग्णांना सिव्हिल हॅास्पिटल मध्ये नेले, धीरज भैय्या पानसंबळ यांनी एका रात्रीतून कोव्हिड सेंटर उभे केले आणि सेंटरला वर्गणीचा ओघ आणला.
सर्व गावक-यांच्या प्रयत्नाने छोट्याशा गावाने कोरोनाला आटोक्यात आणल्याबद्दल गावाचे सर्वत्र कौतूक होत आहे.