मुंबई प्रतिनिधी :
दि. ०८ एप्रिल २०२५
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी मराठमोळा खेळाडू केदार जाधव नव्या इनिंगला सुरूवात करतोय. केदार जाधव आता राजकारणाच्या मैदानात उतरणार आहे. आज दुपारी मुंबईमध्ये तीन वाजता तो भाजप कार्यालयामध्ये हा प्रवेश करणार आहे. केदारच्या पक्षप्रवेशासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रेशेखर बावनकुळे हे उपस्थित राहाणार आहेत. केदारने काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर केदारच्या राजकारणामध्ये प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता तो भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने यावर शिक्कामोर्तब झाले.
केदार जाधव याने 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. वयाच्या ३९ व्या वर्षीच त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. केदारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही. टीम इंडियाकडून त्याने वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्त्व केले होते. केदारची पुण्यातील धोनीसोबतची मॅच आजही सर्वांच्या आठवणीत आहे, केदारने शतकी खेळी करत संघाच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. इंग्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यामध्ये केदारने वादळी खेळी केली होती. ६५ चेंडूत शतक झळकावले होते, ७६ चेंडूत १२ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १२० धावा केल्या होत्या. विराट कोहलीसोबत त्याने टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले आणि विजयाकडे नेले होते.
केदारने टीम इंडियाकडून २०१४ साली वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. केदार जाधव याने ७३ वन डे सामने खेळले असून त्यामध्ये ५२ डावात त्याने १३८० धावा केल्या होत्या. यामध्ये दोन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. त्यासोबतच त्याने २७ विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. टी-२० फॉरमॅटमध्ये त्याने २०१५ साली पदार्पण केले होते. टी-२० क्रिकेटमध्ये ९ सामने खेळतान त्याने १२२ धावा केल्या असून ५८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर आयपीएलमध्ये ९५ सामने खेळताना ८१ डावात १२०८ धावा केल्या होत्या. त्यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे.