मुंबई प्रतिनिधी :
दि. ०८ एप्रिल २०२५
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पैशांसाठी उपचारास नकार दिल्यानं ईश्वरी (तनिषा) भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. यामुळं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर आता मंगेशकर कुटुंबांबद्दल अनेकजण व्यक्त होत आहे. मंगेशकर कुटुंबायांच्या व्यवहाराबद्दलही अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता दीनानाथ मंगेशकर ज्या जागेवर उभं राहिलं आहे, त्या जागेचे मूळ मालक असलेल्या खिलारेंनी या प्रकरणावर खंत व्यक्त केली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जागा दिल्याचा पश्चाताप होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
लता मंगेशकर यांना पुण्यात हॉस्पिटल उभारायचं होतं.त्यासाठी त्या जागेच्या शोधात होत्या. यावेळी खिलारे कुटुंबियांनी त्यांची कोट्यवधींची जागा मंगेशकर यांना हॉस्पिटलसाठी दान केली होती. पण आता या निर्णयाचा पश्चाताप होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. ज्या भाऊसाहेब खिलारे यांनी ही जमीन दान केली होती त्यांचे चिरंजीव चंद्रसेन खिलारे यांनी आता एबीपी माझा वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या महिलेचा उपचारांअभावी मृत्यू होत असेल तर हे प्रचंड वेदनादायी असल्याचं खिलारे यांनी म्हटलं आहे.
आमच्या पूर्वजांनी सामाजिक उपक्रमांसाठी अनेक जमिनी दान केल्या आहेत. पण प्रश्न असा आहे की, ज्या कारणासाठी खिलारे किंवा इतर कुटुंबिय त्यांच्या जागा देत असतील तर तो हेतू साध्य होतोय का? हे महत्त्वाचं आहे. आमची किती जागा गेली वगैरे हे महत्त्वाचं नाहीये. असं चंद्रसेन खिलारे यांनी म्हटलं.
सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट व्हायरल होतेय. यात ज्या भाऊसाहेब खिलारे यांनी दीनानाथ रुग्णालयासाठी कोट्यवधींची जागा दान केली, त्याच भाऊसाहेब खिलारे यांच्या बाय पास सर्जरीसाठी रुग्णालयानं दहा लाख रुपये घेतले होते. असा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आलाय. तसंच दीनानाथ रुग्णालायत एका फरशीवरही खिलारे यांच्या नावाचा उल्लेखही कुठंही आढळत नाही, असंही या पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे.