कोल्हापूर प्रतिनिधी :
दि. ०९ एप्रिल २०२५
कोल्हापुरातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा तथा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झाला आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला आहे. प्रशांत कोरटकरला 24 मार्चला तेलंगणातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात कोरटकर हा बरेच दिवस फरार होता. त्याचा कोल्हापूर पोलिसांकडून शोध सुरु होता. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरच्या नागपूर येथील घरी देखील धाड टाकली होती. पण कोरटकर फरार झाला होता.
या दरम्यान कोरटकरच्या बाजूने त्याचे वकील कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करत होते. पण त्याचा अर्ज कोर्टाने फेटाळला होता. अखेर त्याला तेलंगणातून 24 मार्चला अटक करण्यात आली होती. दरम्यान, कनिष्ठ न्यायालयाकडून जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या जामीन अर्जावर तीन ते चार वेळा सुनावणी पार पडली. अखेर त्याला कोर्टाने आज जामीन मंजूर केला आहे.
इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा तथा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीनावर आज निकाल जाहीर झाला आहे. या प्रकरणी 30 मार्चला कोल्हापूर सहदिवाणी न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर कोरटकरने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणी दोन दिवसांपूर्वीच युक्तिवाद झाला होता. प्रशांत कोरटकर पुराव्यांशी छेडछाड करु शकतो. त्यामुळे त्याला सखोल तपासापर्यंत जामीम मिळू नये, असा युक्तिवाद वकील असीम सरोदे यांनी केला होता. तर कोरटकरच्या वकिलांनी या प्रकरणात आता बराच वेळ कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे जामीन मिळावा, असा युक्तिवाद केला होता. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. अखेर या प्रकरणी आज निकालाचं वाचन झालं. यामध्ये कोरटकला दिलासा मिळाला.
इंद्रजीत सावंत यांची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी कोरटकरच्या जामीनानंतर प्रतिक्रिया दिली. “प्रशांत कोरटकरला जामीन मिळावा अशाच स्वरुपाचे कलमं लावले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल करताना 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असू नये, अशा स्वरुपाचे कलम लावण्यात आले होते”, असा आरोप असीम सरोदे यांनी केला आहे.
“अशा प्रकरणात जामीन होत असतो. पण जामीन देताना कोणते कारणे लक्षात घेतले हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल. आम्ही देखील त्याचीच वाट पाहतोय. पण एकीकडे वाईट वाटतंय की, केवळ कलमं आणि त्या कलमांमधील शिक्षा किती आहे याचा विचार करुन प्रक्रियावादी पद्धतीने जामीन होणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. न्यायाधीशांची यात कोणतीही चूक नाही. त्यांनी प्रक्रियांचा विचार करुन जामीन दिलेला आहे. पण प्रशांत कोरटकर आता पुराव्यांवर दबाव आणणं, साक्षीदार फोडणं अशा कामांमध्ये गुंतला जाऊ शकतो. त्याला अटींच्या आधारे जामीन मिळणार आहे. त्याने त्या अटींचं पालन केलं नाही तर त्याचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया आम्ही सुरु करु”, असा इशारा वकील असीम सरोदे यांनी दिला आहे.