मुंबई प्रतिनिधी :
दि. १० एप्रिल २०२५
‘बिग बॉस मराठी 5’ या पर्वाचा विजेता असणारा सूरज चव्हाण लवकरच ‘झापुक झुपूक’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सूरजची मुख्य भूमिका असून मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचे फिल्ममेकर केदार शिंदे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सूरजचा हा सिनेमा 25 एप्रिल रोजी रीलिज होणार आहे. त्यापूर्वी सूरजसह सिनेमाची संपूर्ण टीम ‘झापुक झुपूक’चे जोरदार प्रमोशन करते आहे. अलीकडेच प्रमोशनसाठी सूरज वानखेडे स्टेडियममध्येही पोहोचला होता. RCB विरुद्ध MI या सामन्यादरम्यान या सिनेमातील एक गाणेही वाजवण्यात आले. याशिवाय या गाण्यावर खास रील्सही शेअर केली जातायंत. यादरम्यान नृत्यांगना गौतमी पाटीलने सूरजसाठी शेअर केलेल्या एका व्हिडिओने लक्ष वेधले आहे.
गौतमीने चित्रपटातील ‘झापुक झुपूक’ या गाण्यावर रील शेअर करत सूरजचा हा सिनेमा पाहाण्याचे आवाहन केले आहे. हे रील शेअर करताना तिने असे कॅप्शन दिले आहे की, ’25 एप्रिल ला प्रदर्शित होणाऱ्या तुझ्या “झापुक झुपूक” पिक्चरसाठी खूप खूप शुभेच्छा सूरज.
या व्हिडिओत गौतमी ‘झापुक झुपूक’ सिनेमातील गाण्यावर तिच्या खास शैलीमध्ये डान्स करताना दिसते आहे. रीलच्या शेवटी तिने सर्वांना विनंती केली आहे की, ‘आपल्या सर्वांचा लाडका सूरज चव्हाणचा नवीन मुव्ही येतोय, त्यातलं नवीन गाणं झापुक झुपूक नुकतंच प्रदर्शित झालं आहे. तुम्ही सर्वजण सूरजवर प्रेम करताच, पण तरीही मी जसे रील बनवले आहे, तसे तुम्हीही तयार करा. गाण्याला आणि पिक्चरला खूप प्रेम द्या.’
सूरजच्या या चित्रपटात मिलिंद गवळी, जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पुष्कराज चिरपूटकर, दीपाली पानसरे, पायल जाधव हे कलाकारदेखील आहेत. सिनेमातील गाणी आणि ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. तर गौतमीबद्दल सांगायचे झाल्यास, ती लवकरच टीव्ही विश्वात एन्ट्री करणार आहे. स्टार प्रवाहच्या ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमात गौतमी स्पर्धक म्हणून झळकणार आहे.