मुंबई प्रतिनिधी :
दि. ११ एप्रिल २०२५
सुट्ट्यांचा हंगाम सुरू होत असताना राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील शिवशाही बसमधील प्रवास सुविधेबाबत नाराजी दिवसागणिक वाढत आहे. एसटीच्या वातानुकूलित सेवेसाठी जादा पैसे भरूनही अतिशय वाईट सुविधा प्रवाशांना उपलब्ध होत आहेत. बंद पडलेली वातानुकूलित यंत्रणा, मळके पडदे, फाटलेली आसन कव्हर आणि कापूस निघालेली आसने यांमुळे प्रवाशांमधून तीव्र संताप उमटत आहे.
खासगी बससोबत स्पर्धा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने मुंबई-कोकणदरम्यान जून २०१७ मध्ये शिवशाही बस सुरू केली. पहिल्या दिवसापासून शिवशाही टीकेची धनी ठरली. शिवशाहीतील चालक खासगी असल्याने सुरुवातीलाच विविध अपघातांमध्ये सातत्याने शिवशाही चर्चेत येत होती. गाड्यांची अयोग्य देखभाल, थकलेली कंत्राटदारांची देयके आणि बसमधील असुविधा यामुळे शिवशाहीच्या तक्रारी राज्यातून प्राप्त होत आहेत.
“सातारा ते मुंबई असा शिवशाहीने प्रवास सुरू केल्यावर काही अंतर पार केल्यानंतर गाडीतील एसी बंद झाला. चालकाने एसी सुरू करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. महिला-लहान मुले यांची अवस्था गुदमरल्यासारखी झाली होती. अखेर पुण्यात आल्यानंतर प्रवाशांनी पर्यायी व्यवस्थेने मुंबई गाठली. आरामदायी आणि वातानुकूलित प्रवासासाठी शिवशाहीने प्रवासासाठी ६०० रुपये प्रवाश्यांनी मोजले होते. साताऱ्यावरून मुंबईत येण्यासाठी २०० ते ३०० रुपयांत अन्य पर्यायाने सहज प्रवास करता येतो. शिवशाहीच्या अस्वच्छता, एसी बाबत एसटी महामंडळाला लेखी तक्रार केली असता संबंधित विभागाला तक्रार पाठवल्याची प्रतिक्रिया दोन दिवसांनी महामंडळाने दिली,” असे नुकताच प्रवास केलेल्या एका प्रवाशाने सांगितले.
एसटीच्या वातानुकूलित गाड्यांतून प्रवास निम्म्या दरात होतो. शिवशाहीत अत्यंत वाईट सुविधा आहेत. वाहक, आगार व्यवस्थापकाकडे तक्रार करूनही काही फरक पडत नाही. वातानुकूलित यंत्रणेत कागदाचे बोळे आणि प्लॅस्टिकचे कप अडकवल्याचे वारंवार दिसून येते, शिवशाही गाडीची देखभाल, स्वच्छता खरंच होते का, असा प्रश्न महिला प्रवासी संगीता वाणी यांनी केला आहे.
विशेषतः गर्दीच्या हंगामात एसटी प्रवासातील समस्यांची जाणीव अधिक होते. सुट्ट्या असल्याने हजारोच्या संख्येने प्रवासी फिरण्यासाठी, गावी जाण्यासाठी बाहेर पडतात. राज्यातील विविध शहरातील तापमानाने ४० अंश ओलांडले आहेत. प्रवासात उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी वातानुकूलित पर्यायाला प्रवासी पसंती देतात. मात्र जादा पैसे भरूनही प्रवाशांना अस्वच्छ आणि नादुरुस्त शिवशाहीतून प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी उमटत आहे.