मुंबई प्रतिनिधी :
दि. ११ एप्रिल २०२५
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद दिवसागणिक वाढत चालला आहे. आपल्याला पहिल्या पत्नीचा दर्जा मिळावा यासाठी करुणा मुंडे कायदेशीर लढा देत आहे. गेल्याच आठवड्यात माझगाव कोर्टाचा निकाल करुणा मुंडे यांच्या बाजूनं लागला आहे.
धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क कसा झाला, ओळख कशी वाढत गेली, याबद्दल करुणा मुंडे याआधीच बोलल्या आहेत. इंदूरमध्ये असलेल्या भैय्यूजी महाराजांच्या आश्रमात दोघांची भेट झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मग मंदिरात जाऊन दोघांनी लग्न केलं, असा सगळा घटनाक्रम करुणा मुंडे यांनी सांगितला होता. याच प्रकरणात आता धनंजय मुंडेंची बाजू समोर आली आहे.
माझगाव कोर्टानं ५ एप्रिलला करुणा मुंडेंच्या बाजूनं निकाल दिला. या प्रकरणात वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय माझगाव कोर्टानं कायम ठेवला. या निकालाची प्रत आता समोर आली आहे. त्यात धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंसोबतच्या नात्याविषयी सविस्तर तपशील दिला आहे.
२१ मार्च २००१ मध्ये राजश्री मुंडे यांच्यासोबत त्यांचं (धनंजय मुंडे) लग्न झालं. त्यांच्यापासून त्यांना ३ मुलं आहेत. त्यानंतर २०१२-१३ मध्ये विधान परिषदेवर आमदार होण्याची संधी मिळाली. तेव्हा मुंबईला येणं-जाणं वाढलं. याच काळात ते (धनंजय मुंडे) करुण शर्मा-मुंडे यांच्या संपर्कात आले,’ अशी माहिती मुंडेच्या वकिलांनी कोर्टाला दिली आहे.
वकिलांच्या माध्यमातून कोर्टाला दिलेल्या माहितीत धनंजय मुंडे सांगतात की करुणा शर्मा यांच्याकडून आपल्याला २ मुलं आहेत. राजश्री यांच्यासोबत माझं लग्न झाल्याची कल्पना करुणा यांना होती. तरीही त्यांनी रिलेशनशीपमध्ये राहण्याची तयारी दर्शवली. मी आमदार झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पैशांची मागणी सुरु केली. मी आमच्या दोन्ही मुलांना माझं नाव दिलेलं आहे.
करुणा मुंडे यांनी कोर्टात वसीयतनामा आणि स्वीकृतीपत्र सादर केलं आहे. करुणा मुंडे या धनंजय यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा संदर्भ वसीयतनाम्यात असून २०१६ मध्ये तशी नोटरी करण्यात आलेली आहे. कोर्टानं दोन्ही दस्तावेज स्वीकारले असून त्यावर धनंजय मुंडेंनी कोणताही आक्षेप घेतलेला नाही.