धाराशिव प्रतिनिधी :
दि. १२ एप्रिल २०२५
पुण्यामधील कुख्यात गुंड निलेश घायवळबाबत मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिव येथे भूम तालुक्यामधील आंदरूड गावात यात्रेच्या कुस्तीच्या फडामध्ये एका पैलवानाने निलेश घायवळ याच्यावर हल्ला केला. पैलवानाने त्याच्या कानाखाली मारल्याचं दिसून आलं. त्यानंतर घायवळच्या गुडांनी त्या पैलवानाला मारहाण केली. त्यादरम्यान तो तिथून फरार झाला असून अहिल्यानगरमधील जामखेड गावचा तो पैलवान असल्याची माहिती समजली आहे. अद्याप त्याचे नाव समोर आले नसून त्याने घायवळला का मारलं याचे कारणही समोर आलेले नाही.
भुम तालुक्यातील धांद्रुड येथे वार्षिक जत्रेत परंपरेनुसार कुस्त्याचे आयोजन केले होते. या कुस्तीच्या फडात निलेश घायवळच्या श्रीमुखात पैलवानाने लावली. नंतर घायवळ समर्थकानी पैलवानास मारहाण केली. या फ्रि स्टाईल हाणामारीचा video सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
आखाड्यामध्ये प्रसिद्ध मल्ल थापा याची कुस्ती सरु होती. त्यामुळे कुस्ती शौकिनांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. घायवळही तिथे आपल्या समर्थकांसह उपस्थित होता. यात्रा कमिटीमधील कुस्ती फडाचे आयोजक पैलवानांची भेट घेत होते. त्यादरम्यान हलगीवाले आपली कला सादर करून दाखवत होते आणि त्यांच्यामागून घायवळ येत होता. तेव्हा गर्दीमधून आखाड्यामध्ये एक पैलवान उतरला अन् त्याने जाऊन थेट घायवळच्या कानाखाली लगावली. घायवळवर हल्ला झाल्यानंतर त्याच्या गुंडांनी पैलवानाला मारहाण करायला सुरूवात केली. कुस्तीच्या आखाड्यात झालेल्या राड्याने मोठी खळबळ उडाली. पैलवान कोण आणि त्याने घायवळला कानाखाली का मारली असावी? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
दरम्यान, यंदा अनेकदा निलेश घायवळ चर्चेत राहिला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला होता. खासदार संजय राऊतांनी घायवळचा फोटो ट्विट केला होता. निलेश घायवळ हा गजानन मारणे टोळीत होता. त्यानंतर घायवळ याने आपली वेगळी टोळी केली, त्यानंतर मारणे आणि घायवळचं टोळीयुद्ध पुण्याने पाहिलं. दोन्ही टोळीमधील गुंड आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठले होते. निलेश घायवळा हा मूळचा राहणार सोनेगाव ता. जामखेडचा आहे. पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलेल्या घायवळने गजा मारणेसोबत एक खून केला होता. यामध्ये त्याला सात वर्षांची शिक्षा झाली होती. बाहेर आल्यावर झालेल्या वादात घायवळ टोळीतील पप्पू गावडेचा खून मारणे टोळीने केला. त्यानंतर घायवळ टोळीने मारणेच्या टोळातील सचिन कुडले याचा खून केला होता.