मुंबई प्रतिनिधी :
दि. १२ एप्रिल २०२५
अमेरिकेने आता भारतावर लादलेल्या आयात शुल्काला 90 दिवसांसाठी स्थगित केले आहे. म्हणजे अमेरिका किमान 90 दिवसांसाठी भारतीय वस्तूंवर 26 टक्क्यांऐवजी फक्त 10 टक्के आयात शुल्क आकारेल. यानंतर, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले की, “भारत कधीही बंदुकीच्या धाकावर कोणत्याही देशाशी वाटाघाटी करत नाही, तर व्यापारावर चर्चा सुरू करण्यासाठी अनुकूल वेळेची वाट पाहतो.”
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर 26% परस्पर कर लादला होता पण, ट्रम्प यांनी आपल्या निर्णयावर युटर्न घेतला आणि काही दिवसांतच भारतावरील अतिरिक्त कर 90 दिवसांसाठी स्थगित करण्यात करण्याची घोषणा केली. यानंतर आता केंद्रीय मंत्र्यांचे विधान समोर आले आहे. इटली-भारत व्यवसाय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंचात, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जागतिक राजकीय मुद्द्यांवर आणि ट्रम्प यांनी लादलेल्या परस्पर शुल्कावरील 90 दिवसांच्या स्थगितीवर आपली प्रतिक्रिया दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्कावरील निर्णयाकडे, भारत आणि अमेरिकेसाठी दोन्ही बाजू सध्या वाटाघाटी करत असलेल्या द्विपक्षीय व्यापार कराराला, लवकरात लवकर पूर्ण करण्याची मर्यादित संधी म्हणून पाहिले जात आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले, “आम्ही नेहमीच भारताला प्राधान्य देऊ आणि ही भावना लक्षात ठेवून कोणताही करार अंतिम केला जाईल याची खात्री करू. जोपर्यंत आम्ही देश आणि आमच्या लोकांचे हित सुरक्षित करत नाही तोपर्यंत आम्ही (कोणत्याही करारात) घाई करणार नाही. आम्ही कधीही बंदुकीच्या धाकावर बिझनेस कर नाही.”
या संभाषणात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन आणि जगातील इतर अनेक देशांसोबत भारताच्या व्यापार चर्चा कशा प्रगतीपथावर आहेत हे सांगितले. गोयल म्हणाले की जेव्हा दोन्ही बाजू एकमेकांच्या चिंता आणि गरजांबद्दल संवेदनशील असतात तेव्हाच व्यापार चर्चा पुढे सरकते. “इंडिया फर्स्ट या भावनेने आणि 2047 पर्यंत अमृत काळात विकसित भारताकडे आपला मार्ग सुनिश्चित करण्यासाठी, आमच्या सर्व व्यापार वाटाघाटी चांगल्या प्रकारे प्रगती करत आहेत.”
व्हाईट हाऊसच्या कार्यकारी आदेशांनुसार, अमेरिकेने याआधी 2 एप्रिलपासून भारतावर कर लादण्याची घोषणा केली होती पण, आता देशाने 9 जुलैपर्यंत भारतावरील परस्पर कर स्थगित करण्याची घोषणा केली.