मुंबई प्रतिनिधी :
दि. १९ एप्रिल २०२५
भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यनने त्याचा दहा महिन्यांचा हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन प्रवास शेअर केला आहे. २३ वर्षीय आर्यनने आता स्वतःची ओळख अनया अशी करुन दिली आहे. आर्यनचा अनया होण्याचा प्रवास त्याने व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीनंतरच्या फोटोंशिवाय एमएस धोनी आणि विराट कोहली, याचप्रमाणे पिता संजय बांगर यांच्यासोबतचे काही फोटो इंस्टाग्राम रीलमधून शेअर करण्यात आल्या आहेत.
शस्त्रक्रियेच्या दहा महिन्यांनंतर आर्यनने स्वतःची ओळख अनया म्हणून करुन दिली आहे. आर्यन वडिलांप्रमाणेच क्रिकेटपटू असून स्थानिक क्लब क्रिकेटमध्ये इस्लाम जिमखान्याकडून खेळत असे. त्याने लिसेस्टरशायरमधील हिंकले क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करताना धावांचा पाऊस पाडला होता.
अनयाने आपली खरी ओळख मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. “व्यावसायिक क्रिकेट खेळण्याच्या माझ्या स्वप्नाचा मागोवा घेणं हा त्याग, लवचिकता आणि समर्पणाने भरलेला प्रवास होता. सकाळी मैदानात उतरण्यापासून ते इतरांच्या शंका आणि निर्णयांना सामोरे जाण्यापर्यंत, प्रत्येक पायरीवर विलक्षण ताकदीची गरज भासत असे. पण खेळाच्या पलिकडे माझा आणखी एक प्रवास होता. आत्म-शोधाचा मार्ग धुंडाळताना मला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले.” असं अनया म्हणते.
माझ्यातील खऱ्या स्वत्वाला कडकडून भेटणं म्हणजे सुलभ गोष्टी सोडून कठीण निवडी करणं, अजिबात सोपं नसतानाही मी खरी कोण आहे, यासाठी समर्थपणे उभं राहणं, अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. मला कोणत्याही श्रेणीमध्ये आवडत असलेल्या खेळाचा एक भाग असल्याचा आज मला अभिमान वाटतो, केवळ एक खेळाडू म्हणून नव्हे तर ‘मी’ म्हणून. हा रस्ता सोपा नव्हता, पण स्वतःचा शोध घेणे हा सगळ्यात मोठा विजय आहे, असे तिने इंस्टाग्रामवर लिहिले आहे.
सध्या, अनया मँचेस्टरमध्ये राहते आणि तिथल्या एका काउंटी क्लबसाठी खेळत आहे. ती कोणत्या क्लबसाठी खेळते हे अद्याप कळू शकले नाही, परंतु तिच्या इंस्टाग्राम रीलमधील एका क्लिपमध्ये तिने एका सामन्यात १४५ धावा केल्याचे समजते. तत्पूर्वी, अनयाने इंस्टाग्रामवर जाऊन इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ट्रान्सजेंडर व्यक्तीला महिला क्रिकेट खेळण्यास बंदी घातल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.