डीडी न्यूज प्रतिनिधी : उमेश नाडकर
अंबरनाथ : दि. २१ एप्रिल २०२५
तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेल्याने अंगाची लाही लाही होत असतानाच,ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणी कपातीची घोषणा केल्याने अंबरनाथकरांच्या घशाला कोरड पडली आहे. अंबरनाथ तालुक्यात बारवी, बॅरेज,चिखलोली ही तीन धरणे आहेत या तीन धरणातून अनुक्रमे बारवी २०एमएलडी(एमआयडीसीमार्फत), बॅरेज ५० एमएलडी, चिखलोली ६ एमएलडी असा एकूण ७६ एमएलडी पाणी पुरवठा अंबरनाथ शहराला दररोज केला जातो मात्र अंबरनाथ शहरातील वाढत्या इमारती,लोकसंख्या आणि जीर्ण झालेल्या जीवन प्राधिकरणाच्या जलवाहीनी मधून होणारी ३० टक्के पाणी गळती यामुळे आधीच अंबरनाथ शहरातील विविध भागात नागरिकांना वर्षभर कमी दाबाने पाणी पुरवठा होत असतो. या भागातील नागरिक या तक्रारी घेऊन वारंवार जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात चकरा मारत असतात.त्यातच आता उन्हाचा पारा वाढत असताना धरणांतील पाणीसाठा अपुरा पडू लागल्याने पुढील तीन महीने पाणी वितरणाचे नियोजन करण्यासाठी अंबरनाथ शहरातील पूर्व भागात विभागवार चक्राकार पध्दतीने आठवड्यातून एकदा तर पश्चिमेला नव्वद टक्के भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय जीवन प्राधिकरणाने घेतला आहे. आधीच पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या भागातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.आपली पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी नागरिकांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या खाजगी पुरवठादारांवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागात दिवसरात्र पाणी पुरवठा टॅंकर धावताना दिसून येत आहेत. वाढत्या पाणी टँकरच्या मागणीमुळे या टँकर लॉबीकडून मनमानी पद्धतीने रक्कम आकारण्यात येत असून नागरिकांची प्रचंड लूट सुरु आहे. इतर वेळी १४०० रुपयांना मिळणारा टँकर १८०० ते २००० अशा चढ्या रक्कमेला घ्यावा लागत आहे .या टॅंकर लॉबीमध्ये राजकीय वरदहस्त असलेल्यांचा भरणा असल्याने त्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.