पुणे प्रतिनिधी :
दि. २२ एप्रिल २०२५
भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना पुणे येथील हडपसर-सासवड रस्त्यावर सातववाडी बस थांब्यासमोर घडली. दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले होते, तरीसुद्धा अतिरक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मत्यू झाला. सोमवारी सकाळी साडेसात वाजता हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात टँकर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. ईश्वर साहू (वय 26 वर्ष, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, मूळ रा. छत्तीसगड) असे मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टर तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी टँकर चालक राजेंद्र एकनाथ तळेकर (वय 51, रा. वीर, ता. खंडाळा, जि. सातारा) याला अटक करण्यात आली आहे. आप्पासो भीमराव सबळकर (वय 40, रा. वेताळबाबा, गाडीतळ, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी डॉ. ईश्वर साहू हडपसरच्या दिशेने येत होते. सातववाडी पीएमपी बस थांब्यावर एक बस थांबली होती. त्याच्या पाठीमागे साहू होते. पाठीमागून आलेल्या भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने डॉ. साहूंचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. नागरिकांनी धाव घेऊन रुग्णवाहिका व पोलिसांना बोलावून घेतलं आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी टँकर चालक राजेंद्र तळेकर याला अटक केली आहे.
डॉ. ईश्वर साहू हे मूळचे छत्तीसगड येथील रहिवासी आहेत. आयुर्वेदाचार्य (बीएएमएस) मधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयुर्वेद शिक्षणाचा पुढील अभ्यास व अनुभवासाठी ते हडपसर येथे वास्तव्यास होते. मागील दहा वर्षांपासून ब्रह्माकुमारीजच्या अध्यात्म प्रचारद्वारा सेवा कार्यास त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते.