मुंबई प्रतिनिधी :
दि. ०६ मे २०२५
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरोधात पाठिंबा मिळवायला सुरुवात केली असून त्यामध्ये आता रशियाचाही समावेश झाला आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी रशियाने भारताला पाठिंबा जाहीर केला असून त्यामुळे भारताच्या लढ्याला आता मोठं बळ मिळालं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवला. नरेंद्र मोदींना पहलगामनंतर फोन करणारे रशियाचे पुतिन हे 18 वे जागतिक नेते आहेत.
भारतातील दहशतवादी हल्ल्यामध्ये जे कुणी सामील असतील त्यांना कठोर शिक्षा मिळावी असं मत पुतीन यांनी व्यक्त केलं. दहशतवाद तसेच इतर अनेक गोष्टींवर भारत आणि रशिया एकत्र मिळून काम करतील असा विश्वासही पुतीन यांनी मोदींना दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिचाच्या 80 व्या स्थापना दिवसाच्या पुतीन यांना शुभेच्छा दिल्या.
या वर्षाच्या शेवटी भारतात शिखर संमेलन होणार असून त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या पुतीन यांना आमंत्रण दिलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशिया -युक्रेन युद्ध्याच्या पार्श्वभूमीवर वॉरंट जारी केल्यानंतर पहिल्यांदाच पुतिन भारतात येणार आहेत. या आधी भारतात झालेल्या G 20 परिषदेला पुतिन अनुपस्थित राहिले होते. नरेंद्र मोदींनी स्वतःच पुतिन यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे.
आता रशियाचे अत्याधुनिक इग्ला एस क्षेपणास्त्र भारताच्या मदतीला आले आहे. सातत्याने युद्धाची भाषा करत भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानला भारताने आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे. भारताने थेट आपल्या संरक्षण क्षमतेत वाढ करत, पाकिस्तानचे दात घशात घातले. भारताला रशियाकडून अत्याधुनिक इग्ला-एस क्षेपणास्त्रे मिळाली आहेत. त्यामुळे शत्रूची लढाऊ विमाने, ड्रोन आणि हल्ला करणारे हेलिकॉप्टर अगदी जवळून पाडणं शक्य होणार आहे.
भारतीय सैन्याने ही इग्ला-एस क्षेपणास्त्र पश्चिम सीमेवर तैनात केली आहेत. भारताने रशियासोबत केलेल्या 260 कोटी रुपयांच्या विशेष खरेदी करारांतर्गत ही क्षेपणास्त्रे पुरवण्यात आली आहेत. ही क्षेपणास्त्रे आता सीमांवर तैनात केली जात असल्याने पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कराची क्षेपणास्त्र क्षमता आणखी मजबूत झाली आहे. इग्ला-एस ही 1990 च्या दशकापासून वापरात असलेल्या इग्ला क्षेपणास्त्रांची प्रगत आवृत्ती आहे. या क्षेपणास्त्रांची खरेदी केंद्र सरकारच्या आपत्कालीन खरेदी अधिकारांतर्गत करण्यात आली आहे.
दुसरीकडे पाकिस्तानची भीक मागत धावाधाव सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी रशियाकडे मदतीची याचना केली होती. भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेविरोधात पाकिस्तानला पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी पुतीन यांच्याकडे केली होती. पण रशियाने पाकिस्तानच्या मागणीला कोणतीही भीक घातली नाही. त्याउलट रशियाने भारताच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने रूद्रावतार धारण केल्यावर आता पाकिस्तानची पाचावर धारण बसल्याचं दिसतंय. घाबरलेल्या पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांनी तातडीने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं. दुसरीकडे पाकिस्तानी नेतृत्वाने जगभरात पदर पसरला. अमेरिका, तुर्कस्तान, रशियासह इस्लामी देशांच्या संघटनेला पाकिस्तानने साकडं घातलं आहे. तसंच संयुक्त राष्ट्रांकडे सवयीनुसार जात भारताला रोखा असं आवाहन केलं.