आळंदी प्रतिनिधी : दिनेश कुर्हाडे पाटील
दि. ०६ मे २०२५
आळंदी देवस्थानचा ज्ञानभूमी प्रकल्प केवळ वारकऱ्यांसाठीच नव्हे, तर राज्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे पूर्ण सहकार्य राहील. प्रकल्पाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी सर्व मदत शासन स्तरावरून करण्यात येईल असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सप्ताहाला विशेष भेट दिली. त्यांनी ज्ञानभूमी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत आढावा घेतला आणि या प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. मंत्री बावनकुळे यांनी देवस्थानच्या विश्वस्त मंडळासोबत प्रकल्पाच्या विविध पैलूंवर चर्चा केली. सुमारे ४५० एकर जागेत साकारणाऱ्या या प्रकल्पाची माहिती जाणून घेतल्यानंतर, त्यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, डॉ.भावार्थ देखणे, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, ज्ञानेश्वर वीर, डि.डि.भोसले, विजय जगताप, राजेश पांडे, शरद बुट्टे पाटील, संजय घुंडरे, राम गावडे, क्रांती सोमवंशी, किरण येळवंडे, अमोल वीरकर, आकाश जोशी, ज्ञानेश्वर बनसोडे, डॉ.निवेदिता एकबोटे, राहुल घोलप उपस्थित होते.
मंत्री बावनकुळे म्हणाले ज्ञानभूमी प्रकल्पाच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असून या प्रकल्पाच्या माध्यमातून आळंदीच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर पडेल. आळंदी येथे सुरू असलेल्या या भव्य सोहळ्यामध्ये राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक दाखल झाले असून, येथील वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले आहे.