छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : अखलाख देशमुख
दि ७ मे २०२५
कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी “स्त्री लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण कायदा – २०१३” (POSH Act, 2013) ची काटेकोर अंमलबजावणी अत्यावश्यक आहे. या कायद्याच्या कलम ४ नुसार, ज्या कोणत्याही खासगी कार्यालयांमध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, अशा सर्व आस्थापनांनी ‘अंतर्गत तक्रार समिती’ (Internal Complaints Committee – ICC) ची स्थापना करणे बंधनकारक आहे.
या समितीच्या स्थापनेसोबतच, केंद्र सरकारच्या SHE BOX (Sexual Harassment Electronic Box) पोर्टलवर तिची नोंदणी करणेही आता सक्तीचे करण्यात आले आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी सशक्त यंत्रणा निर्माण होईल.
नोंदणीची प्रक्रिया साधारणतः पुढीलप्रमाणे आहे :
सर्वप्रथम https://shebox.wcd.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होम स्क्रीनवर “Private Head Office Registration” हा टॅब निवडा.
त्यानंतर आवश्यक माहिती – जसे की कार्यालयाचे नाव, पत्ता, संपर्क व्यक्ती, समिती सदस्यांची माहिती इ. तपशील भरावेत.
माहिती पूर्ण भरल्यानंतर ‘Submit’ या टॅबवर क्लिक करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
या प्रक्रियेमुळे महिला कर्मचाऱ्यांना लैंगिक छळाविरोधात तक्रार करण्यासाठी एक अधिकृत व सुरक्षित व्यासपीठ उपलब्ध होते.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर.एन. चिमंद्रे यांनी सर्व खासगी आस्थापनांना आवाहन केले आहे की, त्यांनी POSH कायद्याचे पालन करत त्वरित अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून SHE BOX पोर्टलवर नोंदणी करावी. महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा एक महत्त्वाचा आणि जबाबदारीचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.
कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षित असल्या तरच समाजाची आणि संस्थेची खरी प्रगती शक्य आहे.