आळंदी प्रतिनिधी : दिनेश कुर्हाडे पाटील
दि. ०८ मे २०२५
भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी कारवाईनंतर आळंदी शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे जल्लोष करण्यात आला. महाद्वार चौक येथे कार्यकर्त्यांनी एकत्र येत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने ७ मे रोजी पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या कारवाईत लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या प्रशिक्षण केंद्रांसह नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, भिमबर, कोटली आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने एकत्रितपणे ही मोहीम यशस्वी केली.
या यशस्वी कारवाईनंतर आळंदी शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाद्वार चौकात एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘भारतीय लष्कराचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी मा.नगरसेवक सागर भोसले, संतोष गावडे, ज्ञानेश्वर बनसोडे, आकाश जोशी, संकेत वाघमारे, भागवत आवटे, वासुदेव तुर्की, प्रीतम किरवे, कृष्णा पालवे, राहुल घोलप, एकनाथ मोरे, राम पवळे, मंगलताई हुंडारे, संगीता कंकाळे आदी उपस्थित होते.