नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. १० मे २०२५
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष अखेर थांबला आहे. पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारतानं शस्त्रसंधीचा निर्णय घेतलेला आहे. या वृत्ताला पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी दुजोरा दिला आहे. भारतासोबत शस्त्रसंधी झाल्याची माहिती डार यांनी दिली आहे. आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून शस्त्रसंधी झालेली आहे. भारत आणि पाकिस्तानचे लष्करी अधिकारी १२ मे रोजी बैठक घेणार आहेत. दोन्ही देशांनी थेट चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं भारताकडून सांगण्यात आलेलं आहे. पाकिस्तानच्या विनंतीवरुन सैनिकी कारवाई थांबवल्याचं भारत सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
यासंदर्भात भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माहिती दिली की, “पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारतीय लष्कराच्या महासंचालकांना फोन केला. दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5 वाजल्यापासून जमिनीवर, हवेत आणि समुद्रात सुरु असलेला गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. आजपासून सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या आहेत. लष्कराचे ऑपरेशन्स महासंचालक 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा चर्चा करतील.”