करजगाव प्रतिनिधी : निलेश भोकरे
दि. १२ मे २०२५
सततचे नापीक व नैसर्गिक आपत्तींना कंटाळून तीन एकर शेतातील हिरव्यागार संत्रा झाडांवर कुऱ्हाड चालवून संत्रा झाडे तोडण्याचा धक्कादायक प्रकार सध्या जोमात सुरू आहे. स्थानिक शेतकरी प्रफुल्ल तरेकर असे संत्रा बाग तोडणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नैसर्गिक संकटांना तोंड देत संत्रा वाढविला तर योग्य बाजारभाव मिळत नाही तर दुसरीकडे सततची नापिकी या सर्व कारणाने शेतकरी बेजार होत हवालदिल झाले आहेत.तसेच संत्रा बागेमुळे कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. संत्रा बागेला जो उत्पादन खर्च असतो तो करावाच लागतो मात्र गेल्या काही वर्षांपासून सतत संत्रा गळती तसेच रोगराई तसेच उत्पादन कमी यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जो उत्पादन खर्च केला तो खर्चही निघत नसल्याने कर्जाचा बोजा वाढत चालला आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी हे संत्रा बागा तोडून नष्ट करत आहेत.
स्थानिक शेतकरी प्रफुल्ल तरेकर यांनी त्यांच्या रतनपूर सायखेड शेत शिवारातील तीन एकर शेतातील तीनशे संत्रा झाडांवर कुर्हाड चालविली आहे. त्याच बरोबर गेल्या एक दोन वर्षात अनेक शेतकऱ्यांनी संत्रा झाडे तोडून बागा नष्ट केल्या आहेत. एकेकाळी हीच संत्रा बाग शेतकऱ्यासाठी वरदान ठरली होती.त्यांना उत्पादन चांगले होत होते त्यामुळे संत्र्याकडे शेतकऱ्यांची जीवनदायिनी म्हणून पाहिले जात होते.आता मात्र परिस्थिती उलट झाली आहे.लागत खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याने त्याच संत्रा बागा नष्ट होत चालल्या आहेत.