बेलुरा (ता.खामगाव) : शुभम वानखडे
दि. १२ मे २०२५
स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आणि कामातील ढिसाळपणामुळे बेलुरा गावातील रस्त्याचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी दोन वेळा उपोषण करून आवाज उठवला, तरीसुद्धा प्रशासनाने या गंभीर समस्येकडे डोळेझाकच केली आहे. गावातील रस्त्यांची दुरवस्था व पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता रस्त्याचे काम आणि पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण होणे अत्यावश्यक आहे.
गावात सध्या कच्च्या रस्त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि रुग्णवाहिका यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून जाणे ही एक मोठी जोखीम बनते. याशिवाय, गावाजवळील ओढ्यावरचा पूल अपूर्ण अवस्थेतच पडून राहिल्याने दुसऱ्या भागाशी संपर्क तुटतो.
ग्रामस्थांनी याआधी दोन वेळा तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते. परंतु आश्वासनांच्या पुढे काहीच घडले नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, यावेळी त्यांनी अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
“आम्ही अनेकदा निवेदनं दिली, आंदोलने केली, पण रस्त्याचे काम अजूनही सुरू झालेले नाही. प्रशासन फक्त आश्वासनं देत आहे, कृती काहीच नाही,” असे गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.
ग्रामस्थ आता या प्रश्नावर ठोस कार्यवाहीची मागणी करत असून, यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे.
– बेलुरा प्रतिनिधी