नांदेड प्रतिनिधी : मनोज मनपुर्वे
दि. १५ मे २०२५
इंस्टाग्राम वर ओळख झाली त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि भेटण्यासाठी पूण्याहून नांदेडला आलेल्या युवतीवर प्रियकाराने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव मध्ये घडली आहे. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून तरुणा विरोधात तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू मारोती पौळ असं
गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेने हदगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पीडित युवती ही पुणे जिल्ह्यात हडपसर येथील रहिवासी आहे. दोन वर्षा पूर्वी पीडित युवतीची नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील चिंचोळी येथील रहिवासी असलेल्या आरोपीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर त्यानंतर प्रेमात झाले. आरोपी या युवतीला भेटण्यासाठी पुणे येथे जात होता. युवती देखील नांदेडला यायची. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा पीडित युवतीचा आरोप आहे. मात्र मागील सहा महिन्यांपासून तो तिला टाळत होता. संभाषण देखील त्याने कमी केले होते. ९ मे रोजी सदर तरुणी हदगांव येथे प्रियकराला भेटण्यासाठी आली होती. फोन करून तिने आरोपी बाळूला आपण हदगावला आल्याची माहिती दिली. त्यानंतर आरोपीने समजूत काढली, त्यानंतर रात्री कारमध्ये बसवून पांगरी शिवारात नेऊन अत्याचार केला. अशी तक्रार पीडित युवतीने तामसा पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी बाळू पौळ विरोधात अॅट्रॉसिटी आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.