सोलापूर प्रतिनिधी :
दि. १७ मे २०२५
सोलापुरातील बस स्थानकातून चिमुकली हरवल्याने कुटुंबासह सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. याबाबतचा मेसेजही सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र वाऱ्यासारखा पसरला होता. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस हद्दीतील फौजदार चावडीमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तातडीने पावले उचलली आणि खाकी वर्दीतील बाप माणूस धावल्यामुळे काही तासांतच साडेतीन वर्षीय लेक तिच्या पित्याकडे सुखरूप पोहोचली.
मिळालेल्या माहितीनुसार, मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बसस्थानकावर आलेल्या चिमुरडीला अनोळखी महिलेने पळवले. तिच्या कानातील सोन्याच्या रिंग आणि पायातील पैंजण काढून घेत तिला सोलापूर पासून १०० किलोमीटर अंतरावर मोडनिंब येथे एका लग्न समारंभात सोडल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींनी सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट व्हायरल केली आणि अवघ्या सहा तासांत मुलीचे आई-वडील मोडनिंबमधील लग्न समारंभात पोलिसांसह दाखल झाले. मुलीला सुरक्षित पाहून त्यांचे डोळे पाणावले.
सोलापुरातील लक्ष्मण साहेबराव शिंदे हे आपल्या पत्नी आणि मुलीसह सोलापूर बस स्टँन्ड येथे आले होते. यावेळेस एक महिला अचानक शिंदे यांच्या चिमुकलीला घेऊन पसार झाली. चिमुकलीला सोबत घेऊन एका बसमधून ती निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून निदर्शनास आले. सदर बस लातूर ते कल्याण मार्गावरील असल्याची माहिती समोर आली. सोलापूर शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या महिलेचा आणि मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. ही टीम मोहोळ येथील बस स्थानकावर पोहोचली. येथील फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना असे लक्षात आले की सदर महिला ही पुणे रोडवर लहान मुलीला घेऊन गेली आहे.
बावी येथील राजाभाऊ माळी यांच्या मुलीचे लग्नकार्य शुक्रवारी मोडनिंब येथील एका मंगल कार्यालयामध्ये सुरू होते. अक्षताच्या वेळी चिमुरडी वऱ्हाडीना रडताना दिसली. तिची विचारपूस केली असता तिने फक्त मी सोलापूरची आहे, एवढेच सांगितले. या तीन वर्षांच्या चिमुकलीचा फोटो काढून राजाभाऊ माळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि या पोस्टच्या आधारे चिमुकली पुन्हा आपल्या पालकांच्या कुशीत विसावली.
सोलापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक
ही कामगिरी फौजदार चावडी पोलीस स्टेशचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, एपीआय शंकर धायगुडे,एपीआय रोहन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने, पोलीस अजय चव्हाण,पोलीस कॉन्स्टेबल अमोल खरटमल सुरज सोनवलकर, यांनी यशस्वीरित्या पार पाडली.