पुणे प्रतिनिधी :
दि. २९ मे २०२५
पुण्यातील आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तापकीर हे भारतीय जनता पक्षाकडून पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
शंकर सर्जेराव धुमाळ, वय 47 वर्षे, असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमराव तापकीर यांच्या धनकवडी परिसरातील घरात घुसण्याचा प्रयत्न धुमाळने केला होता. आमदारांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी अजित गणपत देवघरे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
आरोपी शंकर धुमाळ हा वारंवार आमदार भीमराव तापकीर यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालत होता. त्याने तीन वेळा आमदारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही आरोपीने शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. सुरुवातीला आरोपीवर किरकोळ स्वरूपाची कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतरही तो पुन्हा पुन्हा येत राहिला आणि शिवीगाळ करत धमक्या देत राहिला. या प्रकरणात कारवाई न झाल्यामुळे आमदारांनी थेट पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे.
कोण आहेत भीमराव तापकीर?
भीमराव तापकीर हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. तापकीर हे २०११ (पोटनिवडणूक), २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००१ मध्ये त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. सलग दोन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.