उदयनगर प्रतिनिधी : सतीश पैठणे
दि. २९ मे २०२५
चिखली तालुक्यातील उदयनगर येथे अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने ११ किलो २० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या गांजाची बाजारभावानुसार किंमत तब्बल २ लाख २० हजार ४०० रुपये असून या प्रकरणी महेश राजेंद्र महानकार (वय २५, रा. इंदिरानगर, वार्ड क्रमांक ४, उदयनगर) याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई २८ मे रोजी सायंकाळी गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. बुलढाणा जिल्हा पोलिसांच्या स्थानीय गुन्हे शाखेला वार्ड क्रमांक ४ येथील एका घरातून गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच, त्यांनी धाड टाकून ही मोठी कारवाई केली.
छाप्यात आरोपी महेश महानकार याच्या घरातून गांजाची साठवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले असून, तो अवैधरित्या गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगून असल्याची कबुली दिली. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (एन डी पी एस ॲक्ट) कलम ८(सी), २०(II)(बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईदरम्यान एपीआय संजय मातोंडकर, हे.कॉ. गणेश पाटील, चाँद शेख, पो.ना.युवराज राठोड, पो.कॉ. दीपक वायाळ, विजेता पवार, ऋषी थूट्टे, हर्षल जाधव, दीपाली चव्हाण, चालक निवृत्ती पुंड व कैलास ठोंबरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या प्रकरणाचा पुढील तपास अमडापूर पोलिसांना वर्ग करण्यात आला असून पुढील तपास अमडापूर पोलिस करत आहे.