अहमदाबाद प्रतिनिधी :
दि. १३ जून २०२५
एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानाला गुरुवार 12 जून रोजी अहमदाबादमध्ये भीषण अपघात झाला. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विमान कोसळून दुर्घटना झाली. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्सचा समावेश आहे. लंडनच्या दिशेने झेपावल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच विमान अपघातग्रस्त झाले. मेघनीनगर परिसरात आगीच्या ज्वाळा आणि काळा धूर दूरवरून दिसत होता. अपघात होण्यापूर्वी पायलटने एटीसीला दिलेला शेवटचा मेसेज समोर आला आहे.
डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे बोईंग 787 विमान अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात कोसळले. विमानाचे कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर हे सहवैमानिक होते. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. काळजाचा ठोका चुकवणारी अपघाताची दृश्ये सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही विमानात होते.
विमानाचा सांगाडा पूर्णपणे जळाला असून त्याचे बहुतेक भाग जळून खाक झाले आहेत. विमान अहमदाबादहून लंडनपर्यंत प्रवास करणार असल्यामुळे इंधनसाठा मोठा होता. ज्या इमारतीला विमानाने धडक दिली ती इमारतही मोठ्या प्रमाणात दुर्घटनाग्रस्त झाली आहे. विमानतळाजवळील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
काय होता शेवटचा मेसेज?
अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यादृष्टीने तपास सुरु आहे. मात्र पायलटने दिलेला शेवटचा मेसेज समोर आला आहे. अपघातापूर्वी वैमानिकाने MAYDAY चा कॉल केला होता. ‘मे डे’ याचा अर्थ मोठा धोका आहे. एअर ट्राफिक कंट्रोलने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अवघ्या काही सेकंदांच्या शांततेनंतर स्फोटाचा मोठ्ठा आवाज ऐकू आला. विमानाचा वैमानिक सुमित सबरवाल होता, तर सह-वैमानिक कुंदर होता. या दोन्ही वैमानिकांशिवाय 10 सदस्यांचा क्रू विमानात होता.
या दुर्घटनेमुळे देशभरात शोककळा पसरली आहे.