मुंबई प्रतिनिधी :
दि. २१ जून २०२५
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आज पार पडला. मुंबईत रेडिओ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात 7 रेडिओ जॉकींनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी लिहिलेल्या कवितेविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी फडणीस यांनी आपली कविता देखील सादर केली. देवेंद्र फडणवीस यांनी आपण दोन गाणी लिहिली असल्याचं देखील यावेळी सांगितलं. यापैकी एक गाणं प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायल्याचं त्यांनी सांगितलं.
“मला लिहिण्याचा पहिल्यापासून छंद होता. मी कॉलेजमध्ये असताना कविता लिहायचो. कवी संमेलनात जायचो. अगदी लहान असताना काही कविता लिहिल्या होत्या. मी लिहिल्यानंतर ते साठवून ठेवलं नाही. जेव्हा वाटलं तेव्हा लिहायचं. स्वत: वाचायचं. जाहीरपणे लिहिण्याचं काम केलं नाही. आता नुकतंच दोन गाणी लिहिली आहेत. राम नवमीच्या वेळी रामावर एक गाणं लिहिलं आहे. मी शंकरावर गाणं लिहिलं आहे आणि शंकर महादेवन यांनी ते गायलं आहे. मी एक गाणं आणखी लिहिलेलं आहे जे तुम्ही शोधलं तर तुम्हाला सापडेल. मी सांगणार नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
तुम्ही लिहिलेल्या कवितेच्या चार ओळी ऐकायला आवडतील, असं आरजे म्हणाले. त्यावर त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. “तुम्हाला खरं सांगू का, तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी देवेंद्र यांनी कविता सादर केली.
फडणवीसांनी सादर केली ‘ही’ कविता –
तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो
नसे ना का अर्थ, अनर्थ तर नसतो
अरे तुम्ही काय कविता कराल
पण, आणि, किंवा, परंतु,
अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे
कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे,
हृदयाला भेदून गेली पाहिजे,
आणि डोक्याच्या वरुन गेली पाहिजे
‘आम्ही बाहेरुन खडूस दिसतो, पण…’
“संगीत आपल्या संवेदनांना जिवंत करतं. आम्ही बाहेरुन खडूस दिसतो. पण आतून खूप चांगले लोक आहोत. त्याचं खूप मोठं श्रेय संगीताला जातं. आपण बघाल की, आम्ही जेवढे राजकारणी आहेत, दिवसभरात 10 रिल बनवतो आणि प्रत्येक रिलमध्ये एक गाणं असतं. आम्ही दररोज 10 गाणी प्रमोट करतो आणि ती 10 गाणी आम्हाला प्रमोट करतात. कॉलेजमध्ये असल्यापासून संगीतासोबत नातं राहिलं आहे. मला गाणी खूप लक्षात आहेत. पण मी सुरात एकही गाणं बोलू शकत नाही. त्यामुळे लपून गाणं हे मला पसंत आहे. त्यामुळे मी गाण्याचा आवाज मोठा करुन गातो. त्याने माझे बेसूर आवाज गाण्यासोबत मिसळतात आणि वाटतं की, आपणही सुरात गात आहोत”, असा किस्सा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला.