फलटण प्रतिनिधी :निकेश भिसे
दि. २२ जून २०२५ :
सोयाबीन लागवडीपासून ते उत्पन्न काढण्यापर्यंत संपूर्ण पिकावरील रोग व कीड, खताची मात्रा यासह उत्पन्नाची विस्तृत माहिती डॉ. जमदग्नी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली आणि सोयाबीन पीक फायदेशीर असल्याचे समजावून दिले.
जिंती, ता. फलटण येथे ग्रामपंचायत सभागृहात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिंती ग्रामपंचायत, जिंती व पंचक्रोशीतील विकास सोसायट्या यांच्या संयुक्त सहभागाने सोयाबीन पीक लागवड व उत्पादन वाढ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
निवृत्त प्रमुख शास्त्रज्ञ कडधान्य संशोधन केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, निवृत्त विभाग प्रमुख बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, डॉ. भीमराव पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, टीएमई हायटेक विभाग उपव्यवस्थापक संदीप शिंदे, शेती कर्ज विभाग उपव्यवस्थापक भानुदास भंडारे, अधीक्षक अमृत भोसले, विभागीय विकास अधिकारी अजित निंबाळकर, उपसरपंच शरद दादा रणवरे सर व त्यांचे सहकारी, जिंती वि.का.स. सोसायटीचे चेअरमन सौरभ हनुमंत रणवरे व त्यांचे सहकारी यांच्यासह बँकेचे कृषी तज्ञ अधिकारी, विकास अधिकारी, शाखाप्रमुख, जिंती, भिलकटी, शिंदेवाडी, खुंटे, साखरवाडी, होळ, फडतरवाडी, चौधरवाडी, सस्तेवाडी येथील शतक री विकास सोसायटीचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. जमदग्नी यांनी सोयाबीन पीक लागवड संदर्भात प्रोजेक्टर लावून शेतकऱ्यांना माहिती दिली. सोयाबीन पिकाचे उत्पन्न जास्तीत जास्त एकरी ४४ क्विंटल घेऊ शकतो आणि घेतले असल्याचा अनुभव त्यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवला. शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला.
काळानुसार बदलणाऱ्या हवामानावर संपूर्ण शेती अवलंबून आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे तरच शेती फायदेशीर होईल असेही त्यांनी सांगितले. अधिक उत्पन्न घेण्यासाठी दि.१५ जुलैपर्यंत सोयाबीन लागवड करणे गरजेचे असल्याचे तसेच उत्तम बियाणे, सरी वरंब्यावर सोयाबीनची लागवड केली पाहिजे, असे डॉ. जमदग्नी यांनी आवर्जून सांगितले. उसाच्या उत्पन्नाबरोबर सोयाबीनचे एकरी उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्या मार्गदर्शनाने ग्रामपंचायत जिंती येथे या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
जिंती ग्रामपंचायत, जिंती वि.का.स. सोसायटीसह पंचक्रोशीतील वि.का.स. सोसायटी यांच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. बँकेचे विभागीय विकास अधिकारी अजित निंबाळकर यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात परिसंवादाविषयी माहिती दिली. डॉ. जमदग्नी व डॉ. भीमराव पाटील यांचा परिचय करून दिला.
जिंतीचे उपसरपंच शरद दादा रणवरे सर यांनी समारोप केला व आभार मानले.