मुंबई प्रतिनिधी :
दि. २५ जून २०२५
आषाढ महिना जवळ आली की अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी आसुसतात ते शेकडो मैल अंतर पार करून कधी एकदा त्या विठूरायाला, त्या पंढरीराजाला डोळे भरून पाहतो यासाठीच. पंढरपूरची वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी जणू दसरा-दिवाळीच, म्हणूनच तर प्रत्येक वारकरी या विठीमाऊलीच्या दर्शनासाठी डोळ्यांत प्राण आणून महिनाभर ऊन-वारा-पाऊस व थंडी अशा कोणत्याही संकटाची पर्वा न करता चालत राहातात. पण गेल्या काही वर्षात वारीचं रुप बदललंय. खरं तर मंदिरातला विठुराया तोच आहे, वारकरीही तेच आहेत, पण यात भर पडली आहे ती सोशल मीडियावर शोऑफ करणाऱ्यांची.
गेल्या काही वर्षात वारीत सहभागी होऊन फोटोसेशन करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. यात राजकारणी, अभिनेते, अभिनेत्रींचाही समावेश असतोच. सिनेमे, मालिकांचं प्रमोशन वारीत केलं जातंय. अशा अनेक गोष्टी खटकणाऱ्या आहेत. यावर आता अभिनेत्री शुभांगी गोखले यांनीही पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.
शुभांगी गोखले या सोशल मीडियावर फार सक्रिय नसतात. पण काही महित्त्वाच्या मुद्द्यांवर मात्र त्या वेळोवेळी व्यक्त होत आल्या आहेत. आता वारीत मिरवणाऱ्या फोटोशूट करणाऱ्यांना त्यांनी सुनावलं आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय हे शुंभागी गोखले यांची पोस्ट?
खूप वर्षांपासून मनात येत राहातं.वारी वर्षानुवर्षं शांतपणे,शिस्तबद्ध चाललेली असताना तिथे मोठाल्या गाड्या नेऊन खिचडीची पाकीटं , केळी वाटायची, मेकअप करून त्या अन्नपूर्णांच्यामध्ये जबरदस्तीने घुसून भाकऱ्या भाजायच्या.. असे अनेक प्रकार करून त्या भक्तीपूर्ण वातावरणाचा विचका करायचा.. कशासाठी? असं शुभांगी गोखले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं.
त्या पुढं म्हणतात की, काही दिवसांत “काजवा महोत्सव” नामक प्रकार सुरू होईल. त्यांचा हा मिलनाचा काळ..मादी जमिनीलगत असते, नर आपल्या प्रकाशानी तिला आकर्षित करत असतात. अशा ठिकाणी बुटांनी जमीन तुडवत,टॉर्चेसचा प्रकाश न् बडबड करून घोळक्यानी तिथे निसर्गाची लय बिघडून टाकायची.. खूनच करायचा.. खूप लिहायचंय . पण उद्विग्नतेमुळे थकले. रामकृष्ण हरी.पांडुरंगा.. सांभाळ रे..
शुभांगी गोखले यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.यावर अनेक नेटकऱ्यांनी सहमत असल्याच्या कमेंट्सही केल्या आहेत.