डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. २६ जून २०२५
जेव्हा एखाद्या कुटुंबातील मुलगा आपलं घर सोडून दुसऱ्या शहरात राहायला जातो, तेव्हा कुटुंबातील सदस्यांच्या भावुकतेला पारावार राहात नाही. याचप्रमाणे जर देशाचा वीर शुभांशू शुक्ला अंतराळात रवाना झाला असेल, तर त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी हा अभिमानाचा आणि तितकाच भावनिक क्षण ठरत आहे. अशा स्थितीत, माध्यमांनी त्यांच्या आई आणि पत्नीशीही संवाद साधला.
यावेळी दोघींनीही अंतराळ प्रवासी शुभांशूच्या विशेष गुणांचे वर्णन केले आहे. तसेच, अंतराळात निघालेल्या शुभांशूने इंस्टाग्रामवर त्यांच्या कुटुंबाबद्दल, मित्रांबद्दल आणि फॉलोअर्ससाठी एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे. ती वाचल्यानंतर सारेच भावनिक झाले आहेत. शुभांशूने त्यांच्या पत्नीचा एक अतिशय भावनिक फोटो देखील पोस्ट केला आहे आणि तिच्याबद्दलच्या त्याच्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी अॅक्सिओम-४ मोहीम बुधवारी दुपारी १२ वाजून ०१ मिनिटांनी फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथील लाँच कॉम्प्लेक्स ३९ए वरून प्रक्षेपित करण्यात आली. खरंतर ते २२ जूनलाच प्रक्षेपित होणार होते, परंतु काही कारणास्तव प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर आज दुपारी २:३१ ईडीटी किंवा पूर्व वेळ क्षेत्र (भारतीय वेळेनुसार दुपारी १२) ची विंडो ठरवण्यात आली.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एअर फोर्स ग्रुप कॅप्टन शुभांशू आणि त्याची पत्नी कामनाची लव्हस्टोरीही खूप खास आहे. शुंभांशू आणि कामना लखनऊमधील एका प्राथमिक शाळेत एकत्र शिकत होते, तेव्हा त्यांची ओळख झाली. कामना म्हणाली, ‘आम्ही तिसऱ्या वर्गापासून एकत्र शिकत आहोत. आम्ही दोघेही खूप चांगले मित्र आहोत. मी त्याला गुंजन म्हणून ओळखते, शुभांशू आमच्या वर्गातील सर्वात लाजाळू मुलगा आहे, जो आता अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे.’
या प्रेमळ जोडप्याला आता ६ वर्षांचा मुलगा देखील आहे. शुभांशूची आई आशा शुक्ला यांनी अॅक्सिओम-४ मोहिमेपूर्वी कामनाच्या अढळ पाठिंब्याबद्दल तिचे कौतुक केले आणि तिच्याशिवाय हे यश शक्य झाले नसते, असे त्यांनी अधोरेखित केले.
शुभांशूची आई पुढे म्हणाली, ‘हा आमच्यासाठी आणि सर्वांसाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. सर्वत्र पोस्टर्स लावले जात आहेत. या देशातील, या त्रिवेणी नगरचा एक माणूस इतक्या उंचीवर पोहोचणार आहे, याचा सर्वांना आनंद आहे. आम्ही त्याला आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठवत आहोत. शुभांशूला कामनाचा पूर्ण पाठिंबा आहे. तिच्याशिवाय हे शक्य झाले नसते. तिने त्याच्या यशात सर्वात मोठी भूमिका बजावली आहे.’
इंस्टाग्रामवर शुभांशूने @gagan.shux या आयडीवरुन दोन फोटो पोस्ट केले आणि त्यात लिहिले की,’आपण २५ जूनला सकाळी लवकर या ग्रहावरून निघण्याची योजना आखत असल्याने, या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आणि घरी असलेल्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल आभार मानू इच्छितो.’
‘या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या कुटुंबाचे आणि मित्रांचे खूप खूप आभार. कधीकधी तुमच्या जवळचे लोक असा त्याग करतात जे तुम्हीही पूर्णपणे समजू शकत नाहीत, परंतु ते तुमच्यावरील प्रेमामुळेच असं करतात.’
‘एक अद्भुत प्रवासाचा भागीदार असल्याबद्दल @kamnashubha यांचे विशेष आभार. तुमच्याशिवाय हे काहीही शक्य झाले नसते. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणीही एकटं अंतराळात प्रवास करत नाही. आपण ते अनेक लोकांच्या खांद्यावर अवलंबून करतो. मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे.’ लोकांनी या पोस्टवर खूप अभिमानास्पद आणि प्रेमळ कमेंट्स लिहल्या आहेत.