पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
दि. २६ जून २०२५
पुण्यातील तळवडे आयटी पार्क परिसरातील डाऊन टाऊन हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत बुधवारी सकाळच्या सुमारास एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह सापडल्याची घटना समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विवाहबाह्य संबंधातून पतीनेच पत्नी आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याचा आरोप आहे. पुण्यातच जुन्नर येथील तलाठी आणि महाविद्यालयीन तरुणीच्या आत्महत्येची घटना ताजी असताना दुसऱ्याच दिवशी असा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे.
मंगला सुरज टेंभरे, वय 30 वर्ष, रा. अमरावती, आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे, वय 55 वर्ष, रा. अकोला, अशी खून झालेल्या दोघा जणांची नावे आहेत. देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. तसेच प्राथमिक तपासात दोघांचाही खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ठेकेदार दत्तात्रय साबळे याला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगला आणि जगन्नाथ हे तळवडे परिसरात वास्तव्यास होते. मात्र आज सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांना मोकळ्या जागेत या दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. याबाबत नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज, साक्षीदारांचे जबाब आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे तळवडे आयटी पार्क आणि आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणी होत आहे. देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तपास करत असून लवकरच या खुनाच्या गूढाचा उलगडा होईल, अशी ग्वाही पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी, दुर्गवाडी कोकणकड्याजवळ 1300 फुटांवर पडलेले दोन मृतदेह जुन्नर रेस्क्यू टीमने वर काढले. ते मृतदेह श्रीगोंद्याचे बेपत्ता तलाठी रामचंद्र पारधी आणि कॉलेज विद्यार्थिनी रुपाली खुटाण यांचेच असल्याची खात्री नातेवाईकांनी केली.