मुंबई प्रतिनिधी :
दि. २६ जून २०२५
‘इमर्जन्सी’या चित्रपटाविषयीचा वाद सुरू असतानाच कंगना तिच्या वक्तव्यांमुळंही वादात अडकताना दिसतेय. हिमाचल प्रदेशमध्ये पंजाबमुळे अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ झाली आहे…असं तिनं म्हटलं होतं. आता या वक्तव्यामुळं कंगना चर्चेत आली आहे. यावर आता प्रतिक्रिया उमटत आहेत. एका पंजाबी गायकानं कंगनाला पंजाबबद्दल वेडं-वाकडं न बोलण्याची तंबीच दिली आहे.
पंजाबी गायक जसबीर जस्सी यानं कंगनाला खुलेआम धमकी दिली आहे. ‘पंजाबबद्दल वाईट बोलली तर अनेक खुलासे करेन’, असं त्यानं म्हटलं आहे.
“खूप उशिर होण्यापूर्वी कंगनानं अशी वक्तव्ये करणं थांबवायला हवं. मला आता हे बोलायला लागतंय कारण, ती पंजाबवर सतत निशाणा साधतेय. एकदा ती माझ्या कारमध्ये तिच्या एका मैत्रिणीसोबत दारुच्या नशेत बसली होती. तिचा स्वत:वर कंट्रोल नव्हता. जितकी दारू, जितके ड्रग्ज तिनं घेतलेत, मला नाही वाटत कोणी घेतले असतील. जर ती पंजाबद्दल बोलणं बंद करणार नसेल तर, मी तिच्या अशा अनेक गोष्टी सगळ्यांसमोर येऊन येईन”, असं जसबीर जस्सी यानं म्हटलंय.
कंगनानं हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या एका रॅलीत जनतेला संबोधित केलं होतं. आपल्या शेजारचं राज्य पंजाबमध्ये ड्रग्जची नशा केली जाते, तिथली तरुणाई दारुच्या नशेत बुडाली आहे. तर हिमाचलमध्ये हे चित्र उलट आहे, पंजाबच्या तरुणाईला फॉलो न करण्याचा सल्लाही तिनं यावेळी दिला होता.
आता कंगना या सगळ्यावर काय प्रतिक्रिया देणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून ‘इमर्जन्सी’ सिनेमाचा वाद सुरू होता. या चित्रपटाविषयीचा न्यायालयीन वाद शुक्रवारी निकाली निघाला. मात्र, पुनर्विचार समितीनं सुचवल्याप्रमाणे या चित्रपटातील विशिष्ट दृश्ये व शब्द वगळून चित्रपटाची सुधारित प्रत पुनर्विलोकनासाठी आल्यानंतरच सेन्सॉर बोर्ड प्रदर्शनासाठी मंजुरी देणार असल्याचेही स्पष्ट झालं आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळात लागू केलेल्या आणीबाणीवर आधारित हा चित्रपट आहे. कंगना यांची कंपनी मणिकर्णिका फिल्म्स आणि झी एंटरटेन्मेंट या कंपन्यांतर्फे निर्मित या चित्रपटात कंगना यांनीच दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. सेन्सॉर बोर्डाने २९ ऑगस्ट रोजी मंजुरीचा ई-मेल पाठवल्याने चित्रपट ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता.