नाशिक प्रतिनिधी :
दि. ३० जून २०२५
खासदार संजय राऊत यांनी स्वत: मिठाचा खडा टाकून शिवसेना भाजपची युती तोडली. २५ वर्षे अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेली युती राऊतांमुळेच तुटली असून, आज ते काँग्रेससोबत आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी यांना पायताणाने मारले असते. इतरांबद्दल बोलण्यापेक्षा तुम्ही काय केले, हे आरशात पाहा, असा टोला राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी रविवारी नाशिकमध्ये लगावला.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या योगेश कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात मिठाचा खडा टाकला. ते एकत्र येऊ नयेत यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत कदम म्हणाले, ‘ज्यांनी शिवसेना भाजपची युती तोडली व काँग्रेससोबत हात मिळवणी केली, त्यांना इतरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. आपण स्वत: काय केले हे राऊतांनी पाहावे, असा सल्ला कदम यांनी दिला. २५ वर्षे उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका लुटली. आता पुन्हा महापालिकेवर सत्ता यावी यासाठी उद्धव आणि राज ठाकरे यांना एकत्र यावेसे वाटते आहे. महाराष्ट्र त्यांच्या हातातून गेला. आता मुंबई हातातून जाऊ नये यासाठी त्यांचा खटाटोप सुरू असला तरी ते एकत्र येऊनही महापालिकेवर सत्ता आणू शकणार नाहीत, असा दावा कदम यांनी केला.
नाशिक महापालिकेत शिवसेनेचे ३५ नगरसेवक होते. त्यापैकी २८ नगरसेवक पुन्हा एकनाथ शिंदे यांच्यावरील विश्वासामुळे शिवसेनेत परतले आहेत. अनेकांना शिवसेनेत येऊन काम करण्याची इच्छा आहे. परंतु, गुन्हेगारी प्रवृत्तींना शिवसेनेत प्रवेश नसल्याचे पक्षाचे धोरण आहे. पक्षात येणाऱ्यांची चाचपणी करूनच त्यांना प्रवेश दिला जात असल्याचे कदम यावेळी म्हणाले. मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत असले, तरी जुने आणि नवीन असे मिळूनच आम्ही काम करणार आहोत. जो सक्षम कार्यकर्ता आहे, त्यालाच उमेदवारी मिळणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिकीट वाटपात अडचणी येणार नाहीत. तिकीट वाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे कदम यांनी स्पष्ट केले.
मुलांना गुन्हे करण्यास प्रवृत्त करणारे रडारवर
अल्पवयीन मुलांचा उपयोग गुन्ह्यांसाठी करून घेतला जात असल्याचे गृह विभागाचे निरीक्षण आहे. नवीन कायद्यानुसार लहान मुलांना गुन्ह्यांसाठी प्रवृत्त करणाऱ्यांवरदेखील त्याच गुन्ह्याचे कलम लावून कारवाई सुरू केली आहे. एमडी ड्रग्जच्या कारवाया होऊनही हे प्रकार थांबविणे देशापुढे आव्हान आहे. ड्रग्जचा जेथून पुरवठा होतो, त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहाचणे आमच्यापुढील आव्हान आहे. राजकीय पार्श्वभूमीच्या गुन्हेगारी प्रवृत्तींकडे गुन्हेगार म्हणूनच बघावे. कुणालाही पाठीशी न घालता त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे निर्देश आपण पोलिसांना दिल्याचे कदम यांनी सांगितले.