मुंबई प्रतिनिधी :
दि. ०४ जुलै २०२५
मुंबईतील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेने 16 वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. शिक्षिकेने राजीनामा दिला की तिला राजीनामा देण्यास भाग पाडले, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच, शाळेला या अत्याचाराबद्दल आधीपासून काही माहिती होती का, हे देखील पोलीस शोधत आहेत. जानेवारी 2024 मध्ये अत्याचारांना सुरुवात झाल्याचा आरोप आहे, तर शिक्षिकेने एप्रिलमध्ये राजीनामा दिला, असे म्हटले जात आहे. गेल्या शनिवारी जेव्हा शिक्षिकेला अटक झाली, तेव्हाच आम्हाला याबद्दल समजले, असा दावा शाळा प्रशासनाने केला आहे.
पोलिसांनी गुरुवारी शिक्षिकेची मानसशास्त्रीय चाचणी केली. गुन्हा करण्याच्या वेळी ती मानसिकदृष्ट्या ठीक होती की नाही, हे तपासण्यासाठी ही चाचणी करण्यात आली. पोलिसांनी शिक्षिकेला गुरुवारी POCSO कोर्टात हजर केले. न्यायालयाने तिला 16 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आरोपी असलेली 40 वर्षीय शिक्षिका विवाहित असून तिला मुले आहेत. डिसेंबर 2023 मध्ये शाळेच्या वार्षिक कार्यक्रमासाठी डान्स बसवताना ती संबंधित विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली. जानेवारी 2024 मध्ये तिने त्याला पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवण्यासाठी मागणी घातली, असे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी शिक्षिकेच्या एका मैत्रिणीवरही गुन्हा दाखल केला आहे. ही मैत्रीण मुलाला शिक्षिकेशी संपर्क साधण्यास मध्यस्थी करत असल्याचा आरोप आहे. जेव्हा मुलगा शिक्षिकेपासून दूर राहू लागला, तेव्हा या मैत्रिणीने त्याच्याशी संपर्क साधून दिला. ही मैत्रीण पेशाने डॉक्टर आहे. तिनेच मुलाला अँक्झायटी कमी करणारी औषधे दिली होती. शिक्षिका मुलाला पंचतारांकित हॉटेल्समध्ये घेऊन जायची, त्याला दारू पाजायची आणि नंतर लैंगिक अत्याचार करायची, असे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी शाळेतील अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवायला सुरुवात केली आहे. शिक्षिकेची नियुक्ती, राजीनामा आणि मुलाचा शाळेतील प्रवेश यासंबंधी कागदपत्रे जमा करत आहेत. शिक्षिका 2021 मध्ये शाळेत रुजू झाली, तेव्हा कोरोनामुळे शाळा ऑनलाईन होती, असे पोलिसांनी सांगितले. या शाळेत येण्यापूर्वी ती मुंबईतील दुसऱ्या मोठ्या शाळेत शिकवत होती, असे एका शिक्षकाने सांगितले.
आरोपी शिक्षिकेने एप्रिल 2024 मध्ये राजीनामा दिला. तिच्याविरुद्ध कोणत्याही विद्यार्थी किंवा पालकांनी तक्रार दाखल केली नाही, असे सूत्रांनी सांगितले. शिक्षिकेच्या नवऱ्याचा जबाबही नोंदवला जाणार आहे.
शिक्षिकेची मानसिक चाचणी सकारात्मक आली आहे. याचा अर्थ ती मानसिकदृष्ट्या ठीक आहे. पोलिसांनी तिला लैंगिक अत्याचाराबद्दल विचारले, तेव्हा तिने सांगितले की, “आमचे नातं शारीरिक संबंधांपेक्षा खूप पुढे होते.” आजही तिच्या मनात त्या मुलाबद्दल भावना आहेत, असे तिने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, अँक्झायटी कमी करणारी औषधे देणारी डॉक्टर चौकशीसाठी हजर झाली नाही, तर तिच्याविरुद्ध लुकआउट सर्क्युलर जारी केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. ती लंडनला गेली असल्याची माहिती आहे. शाळा प्रशासन पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे, असे त्यांनी सांगितले.