मुंबई प्रतिनिधी :
दि. ०९ जुलै २०२५
32 वर्षीय सीए राज मोरे याच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी राहुल परवानी आणि सबा कुरेशी या दोघांना अटक केली आहे. राहुल मॉडेलिंग करतो, तर सबा त्याची सहकारी आहे. या दोघांनी मिळून राजला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून 2.47 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. राज आणि राहुल यांच्या समलिंगी संबंधांचे व्हिडिओ दाखवून राहुल-सबा जोडगोळी त्याला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप आहे. या तणावातून राजने आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. राजने आत्महत्येपूर्वी आईला एक भावनिक चिठ्ठी लिहिली होती, यात त्याने राहुल आणि सबा या दोघांचा उल्लेख केला होता.
राज मोरे याने मुंबईतील सांताक्रूझ (पूर्व) येथील राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी 26 वर्षीय राहुल परवानी आणि त्याची 22 वर्षीय साथीदार सबा कुरेशी यांना अटक केली आहे. राजने आत्महत्येपूर्वी पोलिसात तीन तक्रारी दाखल केल्या होत्या. राजने काही काळापूर्वीच कर्करोगावर मात केली होती. तो सीएची परीक्षाही पास झाला होता. पण आयुष्यातील अडचणींना तो तोंड देऊ शकला नाही. त्याच्या पश्चात त्याची आजारी आई आहे.
वाकोला पोलिसांनी राहुल आणि सबाला अंधेरीतील लोखंडवाला परिसरातून अटक केली. राज मोरेने चिठ्ठीत लिहिले आहे की, राहुल आणि सबाने त्याला ब्लॅकमेल केले. त्याचे सगळे पैसे संपले होते. त्यामुळे त्याने कंपनीच्या खात्यातून पैसे काढले. या दोघांनी मिळून त्याच्याकडून 2 कोटी 47 लाख म्हणजेच जवळपास अडीच कोटी रुपये उकळले.
वाकोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज मोरे शहरातील एका प्रतिष्ठित कंपनीत सीए म्हणून कार्यरत होता. त्याने आत्महत्येपूर्वी तीन पानी सुसाईड नोट लिहिली आहे, ज्यात त्याने राहुल परवानी आणि सबा कुरेशी यांना त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. मागील काही महिन्यांपासून हे दोघे काही समलैंगिक व्हिडिओंच्या आधारावर राजला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप त्याने केला होता.
सप्टेंबर 2024 मध्ये इंस्टाग्रामद्वारे राज आणि राहुल एकमेकांच्या संपर्कात आल्याचे वृत्त आहे. नंतर त्यांनी मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली. पुढे वेगवेगळ्या ठिकाणी दोघांमध्ये शारीरिक संबंध आले. यावेळी राहुलने दोघांचे एकत्रित व्हिडिओ रेकॉर्ड केले. सबा कुरेशीसह राहुल हा राजला ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत असल्याचे बोलले जाते.
वाकोला पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आरोपी राहुल परवानी लोखंडवाला येथील एका लॉजमध्ये राहत होता. तो आणि सबा कुरेशी यांनी राजवर पैशासाठी दबाव टाकला. आम्ही त्यांच्या बँक खात्यांची तपासणी करत आहोत. त्यांनी 2024 पासून मोरेकडून घेतलेले पैसे कुठे वापरले, हे शोधत आहोत.”
राहुल परवानीने पोलिसांना सांगितले की, त्याने हे पैसे शेअर मार्केट आणि ऑनलाइन गेमिंगमध्ये गुंतवले. तसेच, त्याने दैनंदिन खर्चासाठीही ते वापरले. पोलिसांनी सांगितले की, राहुल परवानीने राज मोरेच्या नावावर बँकेतून SUV गाडीसाठी कर्ज घेतले. त्याचे हप्ते (EMI) सुद्धा राजच भरत होता.
“माझी प्रिय आई, मला माफ कर, मी एक चांगला मुलगा नाही होऊ शकलो. तुला माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण मीच तुला एकटं सोडून जात आहे. मी माझ्या कर्माची फळं भोगत आहे. देव तुला पुढच्या आयुष्यात माझ्यासारखा मुलगा कधीही देऊ नये. मी खूप वाईट वागलो आहे, पूनम मावशी, कृपया माझ्या आईची काळजी घ्या. माझी विविध खात्यांमध्ये पॉलिसी आहेत, ते पैसे घ्या आणि माझ्या आईला द्या. माफ करा,” असे राजने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी राज मोरेने पोलिसात तक्रार केली होती. पण पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. राज मोरेच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी राजच्या कुटुंबीयांनी केली आहे.