डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. ११ जुलै २०२५
राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांनी तिची हत्या केल्याची घटना काल घडली. हरयाणाच्या गुरुग्राममधील सेक्टर ५७ मध्ये गुरुवारी घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. राधिका यादवची हत्या तिचे वडील दीपक यादव यांनी गोळ्या झाडून केली. सकाळी साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यावेळी राधिका त्यांच्या घरातील पहिल्या मजल्यावर असलेल्या स्वयंपाकघरात होती. त्यावेळी दीपक यादव यांनी मागून येऊन राधिकावर गोळ्या झाडल्या. या हत्येमागील कारण पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं आहे.
दीपक यादव यांनी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली. गावातले लोक लेकीच्या कमाईवरुन टोमणे मारायचे. लेकीच्या पैशांवर जगतो, असं अनेक जण चारचौघात म्हणायचे. त्यामुळे लेकीची हत्या केल्याचं दीपक यांनी पोलिसांना सांगितलं. लोकांच्या टोमण्यांमुळे दीपक यांच्या मनावर आघात झाला. त्यातूनच त्यांनी लेकीला संपवलं. ‘माझी लेक राधिका एक उत्तम टेनिसपटू होती. तिनं अनेकदा राष्ट्रीय स्तरावर जेतेपदं पटकावली. पण खांद्याच्या दुखापतीमुळे ती स्पर्धांपासून दुरावली. त्यानंतर तिनं तिची टेनिस अकादमी सुरु केली,’ असं दीपक यादव यांनी पोलीस चौकशीत सांगितलं.
एफआयआरमधील माहितीनुसार, दीपक यादव केवळ अकादमीच नव्हे, तर राधिकाच्या सोशल मीडियावरील रील्समुळेही नाराज होते. राधिका इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिची रील्स शेअर करायची. या सगळ्यामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळत असल्याचं दीपक यांना वाटत होतं. दीपक यांनी राधिकाला अकादमी बंद करण्यास सांगितलं. पण राधिकानं स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे दीपक सातत्यानं मानसिक तणावाखाली राहू लागले. दीपक दूध खरेदीसाठी वजिराबादला जायचे. तिथले लोक राधिकाची सोशल मीडियावरील उपस्थिती आणि अकादमीवरुन दीपकला टोमणे मारायचे. त्यावरुन दीपकला राग यायचा.
काल सकाळी दीपकनं त्याच्याकडे असलेलं पिस्तुल काढलं. या पिस्तुलचा परवाना त्याच्याकडे आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास दीपक स्वयंपाकघरात गेला. तेव्हा राधिका तिथेच होती. त्यानं तिच्यावर मागून तीन गोळ्या झाडल्या. त्यावेळी घराच्या पहिल्या मजल्यावर केवळ तीन जण होते. राधिका, दीपक आणि त्यांची पत्नी मंजू यादव. ताप असल्यानं मंजू यादव खोलीत आराम करत होत्या. त्यांना गोळ्या झाडण्यात आल्याचा आवाज ऐकू आला.