जळगाव प्रतिनिधी :
दि. ११ जुलै २०२५
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विधानसभेत निर्विवाद वर्चस्व मिळविलेल्या राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीमधील घटक पक्षांमध्ये उत्साह आहे, तर निवडणुकीत पराभव झालेल्या महाविकास आघाडीचे आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील पाच माजी आमदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ‘सत्ताधारी’ गोटात प्रवेश केल्याने आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांचा कस लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. मात्र, जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महायुतीतील भाजपचेच दोन्ही उमेदवार निवडून आले. त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीतदेखील जळगाव आघाडीतील एकाही पक्षाचा उमेदवार निवडून न आल्याने या पराभवाने काँग्रेस, शिवसेना उबाठा व राष्ट्रवादी शरद पवार गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील या पक्षांमधील माजी आमदारांसह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी महायुतीमधील पक्षांची वाट धरली.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीनेदेखील विरोधकांमधील या नेत्यांसाठी पायघड्या घातल्याने मागील काही महिन्यांत जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे पाच माजी आमदार महायुतीत डेरेदाखल झाले.
विरोधात राहून कार्यकर्त्यांची कामे पूर्ण होत नसल्याचे सांगत हे नेते सत्ताधारी पक्षात जात आहेत. सद्यस्थितीत सत्ताधारी पक्षात सुरू असलेल्या पक्षप्रवेशांचा ओघ पाहाता, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व काँग्रेस या पक्षासाठी परीक्षा पाहणाऱ्या ठरण्याची शक्यता आहे.
सत्ताधारी पक्षात गेलेले माजी आमदार व नेते
नेते – सोडलेला पक्ष – प्रवेश झालेला पक्ष या क्रमाने –
गुलाबराव देवकर – राष्ट्रवादी शरद पवार गट – राष्ट्रवादी अजित पवार गट
डॉ. सतीश पाटील – राष्ट्रवादी शरद पवार गट – राष्ट्रवादी अजित पवार गट
कैलास पाटील – राष्ट्रवादी शरद पवार गट – राष्ट्रवादी अजित पवार गट
दिलीप सोनवणे – राष्ट्रवादी शरद पवार गट – राष्ट्रवादी अजित पवार गट
दिलीप वाघ – राष्ट्रवादी शरद पवार गट – भाजप
डॉ. अनिल शिंदे – काँग्रेस – भाजप
विष्ण भंगाळे (जिल्हाप्रमुख) -उद्धव सेना – शिंदेसेना