पुणे प्रतिनिधी :
दि. ११ जुलै २०२५
पुण्यातील सुप्रसिद्धा गुडलक कॅफेबाबत एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. गुडलक कॅफेमधील एका ग्राहकाने त्याला दिलेल्या बन मस्कामध्ये काचांचे तुकडे आढळल्याचा दावा केलाय. इतकंच नाहीतर त्याने त्यावेळचा व्हिडीओहीसुद्धा शुट केला आहे आणि तो कॅफेमधील कर्मचाऱ्यांना जाब विचारताना दिसत आहे. हॉटेल मालकांनी माफी मागितली मात्र त्याने काहीच ऐकले नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. संबंधित व्यक्तीने FDA ला ऑनलाईन तक्रारही केली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेमध्ये आकाश जलगी नावाचा व्यक्ती आपल्या पत्नीसोबत आला होता. त्यांनी चहा आणि बन मस्काची ऑर्डर दिली होती, त्यावेळी बन मस्का देण्यात आला. सुरूवातीला ज्या डिशमध्ये त्यांना बन मस्का देण्यात आला होता, त्यामध्ये बर्फासारखं काहीतरी दिसलं. पण त्यांनी व्यवस्थित पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ते बर्फाचे तुकडे नसून त्या काचा आहे. काचांचे तुकडे पाहाताच आकाश यांचा पारा चढला. पत्नीला चहा पिऊ नको असं सांगत हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यास त्यांनी सुरूवात केली.
कॅफे मालकाला सांगितलं असता त्यांनी माफी मागितली आणि बिल घेतले नाही. परंतु आकाश जलगी यांचं म्हणणे आहे की, लक्षात आले म्हणून ठीक पण चुकून ते पोटात गेलं असतं तर मोठा अनर्थ घडला असता. या बाबत FDA ला ऑनलाईन तक्रार आकाश जलगी यांनी नोंदवली असून कॅफे मालकाने सांगितले आहे की, ते बन आउट सोर्स करतात आणि संबंधित व्यक्तीच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्यातील वर्दळीचा असलेल्या एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफे हे खूप जुने आहे. गुडलक कॅफेची वेगळी काही ओळख करून द्यावी लागत नाही. लोक गुडलक कॅफेला आवर्जून भेट देतात आणि तिथल्या फेमस बन मस्काचा आनंद घेतात. मात्र या घटनेमुळे गुडलक कॅफेच्या प्रतिमेला तडा बसलेला आहे. डीडी न्यूज या आरोपाची पुष्टी करत नाही.