मुंबई प्रतिनिधी :
दि. १४ जुलै २०२५
अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही सध्या तिच्या आगामी ‘येरे येरे पैसा 3’ या सिनेमासाठी चर्चेत आहे. या सिनेमानिमित्त ती वेगवेगळ्या मुलाखतीही देत आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या फिल्मी करिअरमध्ये जितकी सक्रिय असते तितकीच राजकीय बाबतीत सुद्धा असते. अनेकदा ती राज्यातल्या राजकारणाबाबतचं मत स्पष्टपणे व्यक्त करते. तेजस्विनी पंडित ही कट्टर मनसैनिक आहे. तिचा राज ठाकरेंना असणारा पाठिंबा ती बरेचदा उघडपणे दर्शवते. त्यांच्या विचारांचे समर्थन करते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर… याबाबत तिचं मत व्यक्त केलं.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने अजब गजब या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत, तिला राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर काय होईल असं विचारलं असता सांगितलं, “असं झालं तर खूप भारी असेल. कारण त्यांचं व्हिजन खूप छान आहे. मी त्यांच्याशी जेव्हा जेव्हा बोलले आहे तेव्हा त्यांच्या बोलण्यातूनच जाणवतं की तो माणूस महाराष्ट्राला सर्वात वरती ठेवतो. कुटुंबापेक्षाही वर ठेवतो. माझ्या मते हे खूप महत्त्वाचं आहे. असे आपल्याकडे खूप कमी राजकारणी आहेत.”
“नितीन गडकरी मस्त बोलतात, शरद पवार सुद्धा…. कधी कधी वाटतं त्यांच्या मेंदूचा अभ्यास केला पाहिजे इतके ते सगळे हुशार आहेत. त्यावेळी विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे काय भाषण करायचे! खरोखर पूर्वीची राजकारणी माणसं खूप वेगळी होती. तेव्हाचं राजकारणही खूप वेगळं होतं. त्यात एक प्रकारची नैतिकता होती, ग्रेस होती, पॉवर होती, पण आत्ताच्या राजकारणात सगळं बिघडल्यासारखं वाटतं.”
या मुलाखतीमध्ये तेजस्विनीला भविष्यात कधी राजकारणात येणार का असं विचारलं. त्यावर तिने उत्तर दिलं, “माझा राजकारणात खूप अभ्यास आहे असं नाही पण मी खूप आधीपासून ते फॉलो करते. त्यामुळेच मी त्याच्यावर बोलू शकते. मला त्यातला फरक कळतो म्हणून मी बोलते. ज्या गोष्टी मला पटतात त्या बाजूने मी उभी राहाते. समाजकारण करण्यासाठी राजकारणात यावंच लागतं असं नाही, पण लोकांनी याकडे एक संधी म्हणूनही बघितलं पाहिजे. सध्या तरी मी अभिनेत्री म्हणून खूप खुश आहे. मला याव्यतिरिक्त काही येईल असं वाटत नाही. आमचे अभिनेत्री आणि राजकारण दोन्ही क्षेत्र अवघड आहेत, त्यामुळे एका अवघड क्षेत्रात काम करत असताना दुसऱ्या अवघड क्षेत्रात सध्या तरी मी जाणार नाही.”
तेजस्विनी पंडितच्या आगामी येरे येरे पैसा 3 बद्दल बोलायचे झाल्यास हा सिनेमा येत्या 18 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.