पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि.०७ जुन २०२१
अजितदादा शांत झोपा…सरकार पाडण्यात भाजपाला काडीमात्र रस नाही अशी उपहासात्मक टिका भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार संजय काकडे यांची अजित पवारांवर केली आहे. तसेच, वॉर्ड एकचा, दोनचा करा किंवा तुम्ही तिघे एकत्र या तरीही महाराष्ट्रातल्या दहा महापालिका निवडणुकीत भाजपाच येणार असा ही काकडे यांनी विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्रात पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई, पुण्यासह दहा प्रमुख महापालिकांच्या निवडणुकीसंदर्भातील वॉर्ड रचनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केले. अजितदादांनी महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड एकचा, दोनचा करावा किंवा महाविकास आघाडी सरकारमधील तिघांनी एकत्र लढावे… तरीही महाराष्ट्रातील या दहा महापालिकांमध्ये भाजपाच सत्तेत येणार, असा ठाम विश्वास मला आहे. तसेच, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात भाजपाला काडीमात्र रस नाही.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्यीय वॉर्ड आणि इतर महापालिकांसाठी दोन सदस्यीय वॉर्ड रचना करावी अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तसेच, परवा पुण्यात पत्रकारांशी बोलताना दररोज रात्री आपण झोपेतून उठून सरकार आहे की पडलं हे बघत असल्याचे खोचक विधान केले होते. अजितदादांनी रात्रीची शांत झोप घ्यावी असं दचकून जागं होऊ नये. कारण, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात भाजपाला बिलकूल स्वारस्य नाही. सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश कोरोनामुक्त करण्यासाठी व देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची कोरोना हीच प्राथमिकता असल्याचे सांगितले आहे. अशा काळात राजकारण करणे योग्य नाही. असे आमचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संस्कार आहेत. त्यामुळे अजित दादा आपण सरकार पडण्यासंबंधी बिलकूल काळजी करू नका. शांतपणे झोपा आणि दिवसभर काम करा. राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवा.
अजितदादांना निवडणुकीचे डोहाळे लागलेत. वॉर्ड रचनेबद्दल त्यांची तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अजितदादांना एकच सांगायचं आहे की, तुम्ही एक, दोन सदस्यीय वॉर्ड रचना करा… तुम्ही तिघे एकत्र लढा… परंतु, जनतेच्या मनात मात्र फक्त मोदी आहेत. ज्यापद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्पित भावनेने जनतेची सेवा करीत आहेत. त्याच भावनेने भाजपाचे सर्व नेते व कार्यकर्ते काम करीत आहेत. त्यामुळे भाजपाचे काम, कार्य यावर महाराष्ट्रातील दहा महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाचाच विजय होणार आहे, असा विश्वास संजय काकडे यांनी व्यक्त केला.
तेंव्हा, काकडे यांनी केलेल्या टिकेला अजित पवार काय उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच, आगामी काळात होणा-या महानगरपालिका निवडणूकीत ही मोठी रंगत येणार हे आता निश्चित झाले आहे.