मुंबई प्रतिनिधी :
दि. २३ जुलै २०२५
अल्पवयीन शालेय विद्यार्थ्याला वेगवेगळ्या आलिशान हॉटेलांमध्ये नेऊन त्याचा लैंगिक छळ केला, अशा आरोपाखाली तीन आठवड्यांपासून अटकेत असलेल्या शिक्षिकेला अखेर विशेष पोक्सो न्यायालयाने मंगळवारी सशर्त जामीन मंजूर केला. मुंबईतील दादर भागात असलेल्या एका प्रतिष्ठित शाळेतील संबंधित 40 वर्षीय विवाहित शिक्षिकेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर तिने जामिनासाठी अर्ज केला होता.
‘डिसेंबर 2023 मध्ये शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ओळख झाल्यानंतर जानेवारी 2024 पासून शिक्षिकेने पीडित विद्यार्थ्याला अनेक वेळा दक्षिण मुंबई व विमानतळ परिसरातील मोठमोठ्या हॉटेलांमध्ये नेले. तिथे तिने त्याच्यासोबत मद्यपान करून आणि मानसिक ताण कमी होण्याची औषधे देऊन त्याचा लैंगिक छळ केला’, असा आरोप आहे.
दहावी उत्तीर्ण होऊन शाळेबाहेर पडल्यानंतरही ती शिक्षिका पिच्छा सोडत नसल्याने मुलाच्या पालकांनी तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिला अटक केली.
‘त्या मुलाचे माझ्याशी प्रेमसंबंध होते आणि ते त्याच्या आईला आवडत नव्हते. म्हणून माझ्याविरोधात खोटा एफआयआर नोंदवण्यात आला. मुलाच्या मनात माझ्याविषयी असलेल्या भावना इत्यादी माहितीच एफआयआरमध्ये दडवण्यात आली’, असा दावा करत शिक्षिकेने जामीन अर्ज केला होता. याविषयीच्या सुनावणीअंती न्यायाधीश सबिना मलिक यांनी अर्ज मंजूर केला.
आरोपीने पीडित मुलाशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधू नये, भेटू नये किंवा धमकावू नये. तिला कोणत्याही साक्षीदाराला किंवा पीडित मुलाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संपर्क करण्यास, धमकी देण्यास किंवा आश्वासन देण्यास मनाई आहे, असे कोर्टाने जामिनात म्हटले आहे.
न्यायालयाने असेही म्हटले आहे की आरोपीने खटल्यासाठी प्रत्येक न्यायालयीन तारखेला उपस्थित राहावे आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई सोडू नये. यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन केल्यास जामीन तात्काळ रद्द केला जाईल, असेही निरीक्षण नोंदवण्यात आले.
शिक्षिकेच्या वतीने मागील सुनावणीत असा युक्तिवाद करण्यात आला होता, की संंबंधित मुलगा तिच्या प्रेमात वेडा आहे. त्याला तिच्या नावाचा टॅटू आपल्या शरीरावर गोंदवून घ्यायचा होता. तिने शाळेतून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, तरीही तो तिला वारंवार समजावत होता, असेही तिने सांगितले होते.