पुणे प्रतिनिधी :
दि. २३ जुलै २०२५
कोंढवा परिसरातील कथित बलात्कार प्रकरणात तक्रारदार तरुणीनेच बनाव रचल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तिच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर तिच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. यामुळे पुण्यातील बहुचर्चित केस पूर्णपणे उलट फिरल्याचे पाहायला मिळत आहे.
पुणे येथील कोंढवा बुद्रुक भागात राहणाऱ्या तरुणीने दोन जुलै रोजी गंभीर आरोप केले होते. एक अनोळखी कुरिअर बॉय तोंडावर स्प्रे मारुन घरात शिरला आणि आपल्यावर अत्याचार केले, असा आरोप तिने केला होता. धक्कादायक म्हणजे आपल्याच फोनमध्ये सेल्फी काढत त्याने ‘मी परत येईन’ असा धमकीचा मेसेज लिहिल्याची तक्रारही तिने केली होती.
तरुणीने पोलिसांत तशी तक्रार दाखल केली आणि त्यावरून तीन जुलै रोजी गुन्हाही नोंदवण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी 250 कॅमेरे तपासून आणि तिचा मोबाइल डेटा रिकव्हर करून केलेल्या तपासात, तरुणीनेच ओळखीच्या तरुणाला घरी बोलावून त्याच्याबरोबर फोटो काढले होते. त्यानंतर फोटो एडिट करुन त्यावर धमकीचा मजकूर टाकला होता. आरोपी तरुण वर्षभरापासून तिचा मित्र असल्याचे स्पष्ट झाले होते.
तरुणीने स्वतःच फोटो एडिट करून पोलिसांची दिशाभूल केली. एडिट केलेला फोटो मोबाइलमध्ये ठेवून मूळ फोटो डिलिट केला. पोलिसांनी दाखवलेल्या सीसीटीव्हीमधील चेहरा ओळखूनही ‘माहीत नाही’ असे सांगितले. डॉक्टरांनाही खोटी माहिती दिली. या तरुणीने हा खोटा आरोप का केला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, तिने हा प्रकार हेतूपुरस्सर आणि योजनाबद्धपणे केल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.
दरम्यान, कोंढवा पोलिसांनी याआधी सांगितले होते की, त्यांनी एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांचा जबाब नोंदवला होता. संबंधित प्राध्यापिका तरुणीने तक्रार करण्यापूर्वी तिच्या संपर्कात होत्या. प्राध्यापिका तक्रारदार महिलेची मैत्रीण आणि मार्गदर्शक आहे. तक्रार दाखल करण्यापूर्वी तिने प्राध्यापिकेकडून मार्गदर्शन घेतल्याचे बोलले जाते. तक्रार कशी दाखल करावी आणि तपास अधिकाऱ्यांशी कसे बोलावे, याबद्दल तिने प्राध्यापिकेकडून माहिती घेतल्याचं चौकशीत समोर आलं होतं.